महाराष्ट्र

मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर पनवेलजवळ विचित्र अपघात

पनवेल : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघाताची भीषणता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज एक्स्प्रेसवेवर झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर पनवेलच्या अष्टविनायक आणि एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुशांत मोहिते (वय 26 वर्षे) आणि प्रथमेश बहिरा (वय 24 वर्षे) अशी मृतांची नावं असून ते पनवेल इथले रहिवासी होते.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर सोमवारी (19 एप्रिल) मध्यरात्री पनवेलजवळील कोन गावानजीक मर्सिडीज कार दुभाजकावर धडकल्याने अपघात झाला. याचवेळी मागून आलेली स्विफ्ट कार मर्सिडीजला धडकली. या अपघातानंतर दोन्ही कार बाजूला घेत असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने मर्सिडीज कारला जोरदार धडक दिली.
या विचित्र अपघातात मर्सिडीज कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. याशिवाय स्विफ्ट कारमधील एक जण जखमी झाला. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या अपघातात स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे.

Related posts