उस्मानाबाद  तुळजापूर

स्वखर्चाने बोअर पाडून गावकऱ्यांना सुरू केला पाणी पुरवठा ; निवडणुकीत दिलेला शब्द २१ वर्षीय शिवसेना ग्रा.पं. सदस्याने पाळला.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – सुरतगाव, ता. तुळजापूर येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा निवडणुकीमध्ये दिलेला शब्द पाळत येथील नूतन शिवसेना ग्रा. पं. सदस्याने एक आदर्श निर्माण केला आहे.

कोणतीही निवडणूक असो निवडून येण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत नेते मंडळी वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने दाखविण्या बरोबरच मोठ-मोठी आश्वासने देतात. मात्र तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील एका २१ वर्षीय शिवसेना उमेदवाराने सतत पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावकऱ्यांना निवडून आलो तर वस्तीमध्ये बोर पाडून देईन असे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्षात कृती करून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना स्वखर्चाने बोअर पाडून पंप बसवून पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे नागरिक देखील सुखावले असून असाच लोकसेवक असावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

निवडणुकीच्या काळात जनतेला वेगवेगळी प्रलोभने दाखविण्या बरोबरच मोठमोठी आश्वासने देखील देण्याच्या सपाटा लावला जातो. निवडणूक संपल्यानंतर सदरील आश्वासनाकडे सपशेल पाठ फिरवली जाते. परंतू या प्रकारास फाटा देत, तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ग्रामपंचायतचे २१ वर्षीय तरुण शिवसेना सदस्य प्रल्हाद माणिक गुंड यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. सुरतगाव येथील वडार वस्ती भागात गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी सतत भटकंती करावी लागत होती. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान प्रल्‍हाद गुंड यांनी या भागात आपला उमेदवारी अर्ज दाखल करून या भागातील नागरिकांना तुम्ही मला निवडून दिले तर मी स्वखर्चाने तुमची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविन असे आश्वासन दिले होते. या भागातील नागरिकांनी देखील गुंड यांना मतदान करून निवडून दिले. जानेवारीमध्ये मतदान प्रक्रिया संपताच गुंड यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये या वस्तीत बोअर पाडून त्यावर मोटर पंप बसवून या भागात मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे दरवर्षी रखरखत्या उन्हात पाण्याच्या समस्येला तोंड देत असलेल्या वडार वस्तीतील नागरीकांची समस्या सुटली आहे. सर्वात मोठ्या आणि महत्त्वाची समस्या असलेल्या पाणी प्रश्नावर उपाययोजना करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळली याबद्दल सर्व ग्रामस्थांकडून मा. प्रल्हाद गुंड यांचे कौतुक व्यक्त केले जात आहे.

८०% समाजकारण व २०% राजकारण या तत्वानुसार गावासाठी काय पण – प्रल्हाद गुंड

शिवसेनेच्या “८०% समाजकारण व २०% राजकारण” या तत्वानुसार मी जनतेने टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत, स्वतःच्या जागेत बोअर पाडून या वस्तीला पाणी पुरवठा सुरु केला आहे. शासनाने पाणी साठा करण्यासाठी ५ हजार लिटरच्या दोन टाक्या व दोन पाइप बसवून द्यावेत. तसेच या बोअरला मुबलक पाणी असल्यामुळे १० ते १२ तास‌ बोअर सुरू असते. ते पाणी संपूर्ण गावाला पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या गावात कुठल्याही बोअर किंवा विहिरीचे अधिग्रहण न करता या बोअरचे पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया राबवावी व गावकऱ्यांची दरवर्षी होणारी भटकंती थांबवावी.

प्रल्हाद माणिक गुंड (ग्रा. पं. सदस्य, सुरतगाव)

Related posts