उस्मानाबाद 

पालकमंत्र्यांच्या वसुली एजंटाने टक्केवारीवर बोलावे का..? – युवासेना शहरप्रमुख रवी वाघमारे

धाराशिव (उस्मानाबाद) – गद्दाराच्या सोबत जाणाऱ्यांची राजकारणातील पत जनता ओळखून असते. त्यात जे खासदार व आमदारावर बोलून प्रसिध्दी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. तेच सध्या पालकमंत्री यांचे पूर्णवेळ वसुली एजंट म्हणून काम करत आहेत. त्यांनी टक्केवारीवर बोलणे म्हणजे हास्यास्पद असल्याचा पलटवार युवासेनेचे शहरप्रमुख रवि वाघमारे यानी केला आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या छुप्या मदतीवर राजकारण करणाऱ्यांना दुसऱ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार उरतो का ? झाकली मूठ सव्वा लाखाची असते. त्यामुळे यापुढे खासदार व आमदारावर खोटे आरोप करताना दहावेळा विचार करा. पन्नास खोके न घेणारे हे खासदार व आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर असला आरोप करण्याने काहीच साध्य होणार नाही. शहराच्या विकासासाठी घेतलेल्या महत्वाच्या कामांना स्थगिती दिल्याने सरकार जनतेच्या हितासाठी नव्हे तर कार्यकत्यांच्या मर्जीसाठी चालत आहे हे सिध्द झाले आहे. त्याचे पुरावे सादर केल्यानंतर पालकमंत्री व तुमचे मार्गदर्शक भावी पालकमंत्री आमदार यांना मिरच्या झोंबल्या. त्यावर खरतर या दोघांनी भुमिका मांडणे अपेक्षित होते. पालकमंत्र्यासाठी पुर्णवेळ व भावी पालकमंत्री यांच्यसाठी अर्धा वेळ देत तुम्ही काम करत आहात. एवढ्यावरच तुमचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे. खासदार व आमदारांच्या पाया पडुन मिळविलेल्या कोट्यावधीच्या निधीतुन तुम्ही किती टक्केवारी मिळविली? असा सवालही वाघमारे यानी केला आहे.

नगरपालिकेत अनैतिक कामे, गुत्तेदारी करताना पोकळ धमक्या देणे, गुत्तेदारांना मारहान करणे असले प्रकार शहरातील जनतेने पाहिलेले आहेत. गुत्तेदारीसाठी एका कंत्राटदारास मारहान केल्याबाबत एक गुन्हादेखील आपल्यावर दाखल झाल्याचा विसर पडलेला दिसत आहे. त्यामुळे तुम्ही टक्केवारीवर बोलायला जाणे म्हणजे विनोद आहे. अंधारात घेतलेल्या मदतीला उजेडात परतफेड करण्याची वेळ आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तुमच्यावर आणली आहे. तुम्हांला केलेल्या उपकाराची परतफेड करायची म्हणून तुम्ही खासदार व आमदारावर चुकीचे आरोप करत आहात. पण जनता हे सहन करणार नाही. स्थगिती सरकारवर कायमचा बहिष्कार जनता टाकणार असल्याचा विश्वास रवि वाघमारे यानी व्यक्त केला आहे.

मिंधे गटाला झोंबल्या…

मिरच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे धाराशिव शहरातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधीचा निधी मंजूर झाला होता. मात्र, या कामाचे श्रेय शिवसेनेला मिळू नये म्हणून सरकार बदलल्यानंतर लगेच या कामांना स्थगिती देण्यात आली.

धाराशिव : मिंधे सरकारने धाराशिव शहरातील विविध विकासकामांना स्थगिती दिल्याच्या पत्राचे फ्लेक्स शिवसेनेच्या वतीने शहरात लावण्यात आले आहेत.

वस्तूस्थिती जनतेला कळावी म्हणून या कामांना सरकारच्या मंजुरीचे पत्र व नंतर मिंधे सरकारने दिलेल्या स्थगितीच्या पत्राचे मोठ मोठे फ्लेक्स शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने धाराशिव शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र, या प्रकाराने मिंधे गटाचा चांगलाच जळफळाट झाला आहे.

Related posts