महाराष्ट्र

शिंदे गटाची माघार, शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच दसरा मेळावा?

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार? या प्रश्नाकडे सध्या शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे. पण शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ठाकरेंचा शिवाजी पार्क मैदानासाठीचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शिंदे गटाचा दसरा मेळावा ओव्हल किंवा क्रॉस मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. पण, याचा अर्थ ठाकरेंना मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यावर एबीपी माझानं महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी येत्या रविवारपर्यंत शिवाजी पार्क मैदानाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे.
मुंबई महापालिका प्रशासनानं शिंदे गट, ठाकरे गट यांपैकी कुणीही दसरा मेळाव्यासाठी मागणी करणारा अर्ज मागे घेतला नसल्याचं सांगितलं होतं. तसेच, येत्या रविवारपर्यंत शिवाजी पार्क मैदानाबाबत निर्णय घेणार असल्याची माहितीही मनपा प्रशासनानं एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. पण आता शिंदेंनी शिवाजी पार्कसाठीचा अर्ज मागे घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

शिंदेंचं एक पाऊल मागे, ठाकरेंचा मार्ग मोकळा?
मंत्री दीपक केसरकरांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटानं एक पाऊल मागे घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. अशातच आता ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळाल्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप मुंबई महानगरपालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाबाबत कोणतात निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिंदे गटानं एक पाऊल मागे घेत जरी दसरा मेळाव्याचं ठिकाण बदललं असलं तरी, मनपा प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, अद्याप शिवाजी पार्क मैदानासाठी मुंबई महापालिकेकडे करण्यात आलेला अर्ज अजून मागे घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरेंना अडचणीत आणण्याची शिंदे गटाची ही नवी खेळी तर नाही, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहेत.
शिंदेंनी दसरा मेळाव्यासाठी नवे पर्याय शोधले असून शिवाजी पार्कवरचा दावा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता ठाकरेंना शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या मात्र शिवसेनेच्या शिंदे गटानं घेतलेल्या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमकं कोणाला मिळणार? हा वाद संपुष्टात येण्याची चिन्ह दिसत आहेत.

Related posts