पंढरपूर

पंढरपूर कार्तिक वारी नियोजन बैठक

सर्व विभागाने समन्वय राखून काम करावे – अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव

पंढरपूर, दि. 20 :
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कार्तिक वारी ही प्रतिकात्मक स्वरुपात करण्यात येणार आहे. ही वारी सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी सर्व विभागाने समन्वय साधून योग्य नियोजन करावे अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव यांनी दिल्या.

कार्तिक वारी नियोजनाबाबत सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह सर्व संबधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जाधव म्हणाले, कार्तिक वारी ही कोरोनाच्या संकटकाळात तसेच आचारसंहितेच्या कालावधीत पार पडत आहे. याबाबत सर्व संबधित विभागाने आपणास दिलेली जबाबदारी 24 नोव्हेबर 2020 पर्यंत पार पाडण्यासाठी नियोजन करावे. मंदीर समितीने महापूजा व इतर विधी पार पाडताना योग्य नियोजन करावे. कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवण्याबाबत नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय निवासस्थानाचे निर्जंतुकरण करुन घ्यावे. तसेच तेथे नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करुन संबधितांना ओळखपत्रे द्यावीत. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने चंद्रभागा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, नगपालिकेने स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच आवश्यक तिथे बॅरेकेटींग करावे अशा सूचनाही अप्पर जिल्हाधिकारी जाधव यांनी यावेळी दिल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आषाढीवारीच्या नियोजना प्रमाणेच कार्तिक वारीचे नियोजन करण्यात येणारआहे. यासाठी पंढरपूर मध्ये सुरक्षिततेसाठी सुमारे 1800 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या आरोग्याची योग्यती काळजी घेण्यात येणार आहे. शासकीय निवासस्थान येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने बॅरेकेंटींग करुन घ्यावे. तसेच मंदीर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे. वारी कालावधीत सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले असल्याचेही अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य विभागाने शासकीय निवासस्थान व श्री विठ्ठल-रक्मिणी मंदीर येथे तज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. ऑक्सिजन, रक्तपुरवठा तसेच मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे. तसेच दर्शनी भागावर कोरोना बाबत जनजागृतीपर फलक लावावेत. नगरपालिकेने स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा, प्रदक्षिणा मार्गावरील आवश्यक ठिकाणी रस्ते दुरुस्ती, मठाचे निर्जतुकीकरण करावे तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मंदीर समितीने पुजेला उपस्थित राहणाऱ्या अधिकारी ,कर्मचारी तसेच संबधितांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी. महावितरणने यात्रा कालावधीत सुरक्षित व अखंडीत वीज पुरवठा राहील यांची दक्षता घ्यावी. अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी दिल्या.

यावेळी बैठकीत राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे विभाग, बीएसएनएल, उपप्रादेशिक परिवहन आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.

Related posts