उस्मानाबाद 

ऑक्सिजन प्रकल्पास परवाना व ना हरकत प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे ; खा. ओमराजे निंबाळकर यांची मागणी.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पास परवाना व ना हरकत प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे अशी मागणी धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभेचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ऑक्सिजन प्रकल्प त्वरित चालू करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या महाराष्ट्रभर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असताना जिल्ह्यातील कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उस्मानाबाद येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातही सद्य परिस्थितीत बेड अपुरे पडत आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ऑक्सिजन सुविधेसह जिल्ह्यातील एकमेव उपचार केंद्र आहे. हा प्रकल्प ७७०० घनमीटर क्षमतेचा असून, हा प्रकल्प परवाना आणि ना हरकत प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करून देखील अद्याप न मिळाल्यामुळे चालू झालेला नाही. या प्रकल्पाद्वारे सध्या ३५० रूग्णांना ऑक्सिजन पुरविला जाऊ शकतो. या उपचार केंद्रात नवीन ४० खाटांची संख्या वाढविण्यात येत आहे. हा प्रकल्प सुरू होण्यासाठी परवाना आणि ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसा प्रस्तावही जिल्हा शल्य चिकित्सक यांनी विस्फोटक विभागास सादर केलेला आहे पण अद्याप परवाना मिळालेला नाही. भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रुग्णांवर सहज उपचार करता येतील व सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. या नव्याने सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पास परवाना व ना हरकत प्रमाणपत्र तात्काळ देण्यासंदर्भात मुख्य विस्फोटक नियंत्रक, विस्फोटक विभाग, भारत सरकार यांच्या कडे पत्रा द्व्यारे खा. ओमराजे निंबाळकर यांनी सुचना केल्या आहेत.

नागरिकांनी शासनाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे व सोशल डिस्टंसींगचे पालन करण्यात यावे असे आवाहन खा. ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी जनतेला केले.

Related posts