महाराष्ट्र

निम्मा महाराष्ट्र लॉकडाऊन!

कडक लॉकडाऊनचा परिणाम म्हणून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊ लागल्याचे सुलक्षण दिसू लागल्याने राज्यभरात हा लॉकडाऊन आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे ठिकठिकाणी वाढत्या रुग्णसंख्येनुसार कडक लॉकडाऊनचे निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आल्याने लॉकडाऊन झालेली शहरे आणि जिल्हे यांची संख्या आता 21 पर्यंत पोहोचते आहे.
सोमवारी 10 मेपासून सिंधुदुर्ग, परभणी आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने नाशिक जिल्ह्यातही 11 दिवसांचा कडक लॉकडाऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी जाहीर केला. नाशिकपेक्षा कमी रुग्णसंख्या असूनही सातारा, सांगली, वाशिमसारख्या जिल्ह्यांनी पूर्ण लॉकडाऊन केले आहे. नाशिक जिल्ह्याची रुग्णसंख्या घटवण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे, असे ते म्हणाले.
लातूर, बदलापूर, वर्धा, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, नांदेड, वासिम, अमरावती, यवतमाळ, अकोला, इंदापूर, बारामती, पंढरपूर या ठिकाणी सध्या कठोर लॉकडाऊन सुरू आहे. मुंबईत कठोर निर्बंध सुरू आहेत. आता लॉकडाऊन झालेल्या शहर आणि जिल्ह्यांची संख्या 21 जवळ पोहोचते आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही लॉकडाऊन वाढवला जाण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला. मुंबईसह महाराष्ट्रात आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन झाल्यास त्याचा आणखी चांगला परिणाम दिसेल, असा दावा त्यांनी केला.
कोल्हापुरातही लॉकडाऊन
दिवसेंदिवस कोरोना रुग्ण व मृत्यूची संख्या वाढू लागल्याने येत्या दोन दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातही 10 ते 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला जाईल. यातून केवळ दूध, औषध दुकाने, वैद्यकीय सेवा वगळण्यात येईल. पालकमंत्री सतेज पाटील कोल्हापुरात आल्यानंतर या लॉकडाऊनची घोषणा करण्यात येईल, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.
लॉकडाऊनवाढीचा निर्णय उद्या होणार
लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसत असल्याने 31 मेपर्यंत तो वाढवावा, असे मत आघाडीतील अनेक मंत्र्यांनी व्यक्त केले आहे. उद्या मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात शनिवारी 53 हजार 605 असलेली रुग्णसंख्या रविवारी पाच हजाराने घटून 48 हजार 401 पर्यंत खाली आली. गेल्या आठवड्यात 65 हजारावर रुग्णसंख्या होती. लॉकडाऊनमुळेच ही प्रगती झाली असल्याचे मत अनेक मंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

Related posts