24.4 C
Solapur
September 23, 2023
महाराष्ट्र

अँटीलिया स्फोटक प्रकरणाची चौकशी करणारे एनआयएचे मुंबई प्रमुख अनिल शुक्ला यांची मिझोरामला बदली

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया निवासस्थानासमोर स्फोटके ठेवल्या प्रकरणाची चौकशी करीत असलेल्या मुंबई एनआयएचे प्रमुख अनिल शुक्ला यांची मिझोरामला बदली करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. अनिल शुक्ला यांनी स्फोटकांच्या चौकशी प्रकरणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शुक्ला यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजते.
स्फोटक प्रकरणासह ज्या गाडीत स्फोटके ठेवण्यात आली होती, त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येसंदर्भात आतापर्यंत निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी तसेच लखनभैया, एन्काउंटर प्रकरणातील आरोपी विनायक शिंदे याना अटक करण्यात आली आहे. स्फोटके प्रकरण तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास अनिल शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना अचानक त्यांच्या झालेल्या बदलीमुळे अनेक तर्कवितर्क केले जात आहेत.
अनिल शुक्ला हे महाराष्ट्रात एनआयएमध्ये प्रतिनियुक्तीवर आले होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नियमानुसार बदली करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्ला हे मिझोराम केडरचे अधिकारी असल्याने मूळ केडरला बदली करण्यात आली असल्याचेही सांगितले जात आहे.

Related posts