पंढरपूर

शहीद मेजर कुणाल गोसावी पुण्यस्मरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान यांच्यावतीने भारत मातेचे थोर सुपुत्र शौर्यचक्र प्राप्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांचा पाचवा गौरवशाली पुण्यस्मरण दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त सेना मेडल कर्नल गिरीधर कोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद माळी, माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.के.धोत्रे व डी.व्ही.पी. उद्योग समुहाचे चेअरमन अभिजीत पाटील या प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी वीरमाता सौ.वृंदाताई गोसावी व वीरपत्नी उमा गोसावी उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या वाखरी येथील स्मारकाचे पूजन करून सर्व मान्यवरांनी व वीरपिता मुन्नागीर गोसावी यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली देत राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये राज्यातील, जिल्ह्यातील मागील वर्षी शहीद झालेल्या जवानांच्या, पोलीसांच्या दहा कुटूंबियांस निमंत्रित करून या कार्यक्रमामध्ये त्यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र, गुलाबपुष्प, शाल, श्रीफळ व अकरा हजार रूपयांचा धनादेश देवून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा, उपस्थित पाहुण्यांचा व वाखरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.कविता पोरे, उपसरपंच संग्राम गायकवाड यांचा ही शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान तर्फे मानचिन्ह, गुलाबपुष्प देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.के. धोत्रे यांना कोरोना योध्दा पुरस्काराने विशेष सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहीद कुणाल गोसावी प्रतिष्ठानचे चेअरमन मुन्नागीर गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश गोसावी यांनी केले. तसेच रक्तदान शिबीर मुन्नागीर गोसावी यांचे दाळे गल्ली येथील घरी घेण्यात आले. यात 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबीरास जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. यात दिव्यांग कल्याण पुणेचे स्वीय सहाय्यक आयुक्त दिलीप गोसावी यांच्या कुटूंबियांनीही सहभाग नोंदविला. त्यानंतर भिंगे भजनी मंडळ यांनी भजनाचा कार्यक्रम अत्यंत सुंदररित्या सादर केला. सदरचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोसावी कुटूंबिय व संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले.

Related posts