दक्षिण सोलापूर

मराठीला ज्ञान व्यवहाराची भाषा करता यावी : डॉ. अरुण शिंदे

अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर विशेष प्रतिनिधी

आधुनिकीकरणाचा परिणाम भाषेवर होतो. आधुनिकीकरणामुळे बोली भाषा नष्ट होत आहेत. एखाद्या भाषेच्या मृत्यूनंतर संस्कृतीचाही मृत्यू होतो. मराठीला ज्ञान व्यवहाराची भाषा बनवली पाहिजे, असे प्रतिपादन नाइट कॉलेज, कोल्हापूर येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरुण शिंदे यांनी केले. ते मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मराठी विभाग आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित अभासी प्रणालीद्वारे व्याख्यानात बोलत होते..

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. भांजे होते. यावेळी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, “एखादी भाषा नष्ट झाल्यास त्यातील बौद्धिक संपदा, ज्ञान, कला याचा ठेवा कायमचा नामशेष होतो. भाषा नष्ट होण्यात भारताचा पहिला क्रमांक लागतो. भारतातील १९८ भाषा मृत्युपंथावर आहेत. जी भाषा काळाची असते तीच भाषा टिकते. तीच रोजगाराची भाषा होईल.” अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. बी. एम. भांजे म्हणाले, “प्रमाणभाषेमुळे बोलीभाषेची अभिरूची संपत आहे. बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मुलांच्या भाषेवर परिणाम होत आहे. प्रमाण भाषेतील शब्द सामान्यजनांना समजण्यापलीकडचे आहेत. त्यामुळे भाषा सोपी साधी करून सांगितली पाहिजे.

यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा. जवाहर मोरे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. प्रा. विजय साळवे यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.

Related posts