महाराष्ट्र

1901 नंतर सर्वात कमी पावसाची नोंद

मुंबई : भारतासह राज्यावर दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. तीन महिन्यात पावसाची मोठी तूट दिसून आली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये पावसाने पाठ फिरवल्याचे दिसलेय. ऑगस्ट महिन्यात भारतात शतकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात फक्त 160 मिमीच्या जवळपास पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट 2023 हे मान्सून वर्ष 1901 नंतरचा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना म्हणून नोंदवला गेला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाची स्थिती ओढावली आहे.

१ जूनपासून संपूर्ण देशात मान्सूनमध्ये पावसाची तूट वाढत गेली. ऑगस्टअखेरपर्यंत देशातील पावसाची तूट 9 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यातच पुन्हा एकदा मान्सून ब्रेकची स्थिती असल्याने ही तूट आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. देशातील काही भागात सध्या चांगला पाऊस (Rain) झाला आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 22 टक्के पावसाची तूट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील 1 जूनपासून सरासरीच्या 19 टक्के पावसाची तूट पाहायला मिळत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

हवामान विभागानं देशात आत्तापर्यत झालेल्या पावसाची माहिती दिली आहे. देशात सरासरीच्या 9 टक्के पाऊस कमी झाला आहे. आत्तापर्यंत देशात 91 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये केरळमध्ये यावर्षी पावसाची मोठी तूट पाहायला मिळात आहे. जूनपासून केरळात आत्तापर्यंत सरासरीच्या 48 टक्के पावसाची तूट झाली आहे.

Related posts