महाराष्ट्र

माझ्याकडे ना कारखाना, ना बँक, ना सोसायटी, मला ना ईडीची भीती ना सीबीआयची, प्रणिती शिंदे

“माझ्याकडे ना कारखाना , ना बँक , ना सोसायटी त्यामुळे मला ईडीची भीती नाही. त्यामुळे मी बिनधास्त टीका करते. मला कोणत्या ईडी-सीबीआयची भीती नाही, असा टोला सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) लगावलाय. पंढरपूर तालुक्यातील अनवली गावात प्रचारावेळी त्या बोलत होत्या. एका बाजूला सूर्यदेव आग ओकत असताना 40 डिग्री तापमानात प्रचार करणे आणि यासाठी मतदार हजर असणे ही डोकेदुखी सर्वच उमेदवारांना असली तरी प्रणिती शिंदे यांच्या दौऱ्यात जनतेचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळू लागला आहे. त्यातच उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचारासाठी सक्रिय झाल्याने प्रणिती शिंदेंना काहीसा दिलासा मिळलाय.

आज काहीही उघडले तरी मोदींचा फोटो पाहायला मिळतो

प्रणिती शिंदे म्हणाल्या, आज काहीही उघडले तरी मोदींचा फोटो पाहायला मिळतो. खताचे पोतेही सोडले तरीही त्यांचा फोटो असतो. विरोधात बोललं की ईडी मागे लावतील असं म्हणतात. पण मला त्याची कसलीही भीती नाही, असं प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केलं. एका शेतकऱ्याने प्रणिती यांची फिरकी  घेताना तुमच्याकडे पैसेच नसतील असे सांगताच प्रणिती शिंदे गडबडल्या आणि लगेच सावरत घेत खरेच आहे, असं सांगितलं. मी फक्त काम करते आणि म्हणून सोलापूर शहरातून तीन वेळा मला निवडून दिलं आहे. मी सत्तेसाठीही राजकारणात आलेली नाही.

माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही

टक्केवारीसाठी राजकारणात आलेली नाही. माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही,असा भाजपाला टोला लगावला . आता आर या पारची लढाई सुरु झाली असून एकदा हि लढाई तुम्ही माझ्यासाठी लढा याच्या पुढच्या सगळ्या लढाई मी तुमच्यासाठी लढेन असे प्रणिती शिंदेनी सांगितले .

उन्हाचा उच्चांक वाढतोय तसा महागाईचाही उच्चांक वाढतोय, जसा त्याचा पारा चढतोय तसा जनतेचाही पारा चढू लागल्याचे प्रणिती शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. उन्हाची आम्हाला , शेतकऱ्यांना सवय आहे , लोकही तसा प्रतिसाद देत आहेत असे सांगताना उन्हाची कोणतीही अडचण जाणवत नसल्याचे शिंदे म्हणाल्या.

Related posts