पंढरपूर

स्वेरीत आल्यावर ऑक्सफर्ड मध्ये आल्याचा भास झाला – आयएएस जे.पी.डांगे.

आयएएस जे.पी.डांगे यांची स्वेरीला सदिच्छा भेट

सचिन झाडे –
पंढरपूर: – ‘स्वेरी ही एक अशी शिक्षण संस्था आहे जी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाची अध्यापन सुविधा प्रदान करते व विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे काटेकोरपणे लक्ष देते. ही बाब विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने लाख मोलाची आहे. आज स्वेरीत आल्यावर ऑक्सफर्ड विद्यापीठात आल्याचा भास झाला.’ असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या अॅडमिशन रेग्युलेटींग अॅथोरीटीचे चेअरमन व महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव श्री.जे.पी.डांगे (निवृत्त आयएएस) यांनी केले.


गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला महाराष्ट्र शासनाच्या अॅडमिशन रेग्युलेटींग अॅथोरीटीचे चेअरमन व महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव जे.पी.डांगे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी चेअरमन श्री. डांगे यांनी स्वेरीतील शैक्षणिक व्यवस्था व सुविधा पाहून गौरवोदगार काढले. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी आयएएस जे.पी.डांगे यांचे व त्यांच्या सोबत आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे व त्यांचे मित्रमंडळी यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘स्वेरी’ ची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल, शैक्षणिक कार्यपद्धती, स्वेरीला मिळालेली मानांकने, संशोधनासाठी आलेला निधी आदी बाबींची डॉ.बी.पी.रोंगे यांनी माहिती दिली. पुढे बोलताना आयएएस डांगे म्हणाले की, ‘शैक्षणिक क्षेत्राचा अभ्यास व तपासणीच्या निमित्ताने अनेक शैक्षणिक संस्थांना भेटी देण्याचा योग येतो. स्वेरीमध्ये ‘शिस्त व संस्कार’ या बाबी ठळकपणे जाणवतात. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी केले जाणारे प्रामाणिक प्रयत्न व तळमळ पाहून स्वेरीच्या शैक्षणिक धोरणाचे विशेष कौतुक वाटते.’ यावेळी त्यांनी प्रवेश प्रक्रिया विभाग, सीईटी परीक्षा केंद्राची देखील पाहणी करून माहिती घेतली. तसेच परीक्षा केंद्र सुरक्षित आणि सुरळीत चालते का? याचीही पाहणी करून काही कमतरता असेल तर सुचविण्यास सांगितले. त्यांनी फार्मसी महाविद्यालयालाही भेट दिली. तेथील कॅम्पसमध्ये असणाऱ्या ‘हर्बल गार्डन’ला भेट देवून तेथील विविध प्रकारच्या आणि दुर्मिळ असणाऱ्या औषधी वनस्पतींची पाहणी करून माहिती जाणून घेतली. बी. फार्मसीचे प्र.प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी ‘हर्बल गार्डन’ मध्ये असणाऱ्या औषधी वनस्पतींची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी प्राध्यापकांशीही संवाद साधला.

यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. डांगे, पंढरपुरचे तहसीलदार मा.सुशील बेल्हेकर आणि उच्च शिक्षण विभाग, सोलापुरचे शिक्षण सहसंचालक डॉ. राहुल बावगे तसेच स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related posts