उस्मानाबाद  तुळजापूर

तामलवाडीतील चिमुकल्यांची अधिकारी व पदाधिकारी यांना शुभेच्छापत्रे.

नववर्षाचा अनोखा उपक्रम -विद्यार्थ्यांची कार्यालयातील एंट्री कौतुकाचा विषय.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – शाळेअभावी कोरोना काळात निर्माण झालेली नकारात्मकता दूर करून मुलांच्या शालेय जीवनात सकारात्मक वातावरण आणण्यासाठी आवडीच्या व नाविन्यपूर्ण उपक्रमाची जोड आवश्यक ठरते. त्या अनुषंगाने आज जि.प. प्रा. शाळा तामलवाडी येथे विद्यार्थ्यांना शुभेच्छा पत्रे बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. शिक्षिका श्रीम. ज्ञानेश्वरी शिंदे यांच्या कल्पनेतून व श्रीम. स्मिता पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये मुलांनी आपल्या कल्पकतेतून सुंदर अशी शुभेच्छापत्रे तयार केली. शिवाय आकर्षक रंगसंगती असल्याने ती सुंदर दिसत होती. मुलांची कलागुणातील रुची वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या शिकण्यात वैविध्य आणण्यासाठी या उपक्रमाचा निश्चितच फायदा होतो. नवीन वर्षाचे स्वागत अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने करताना दिसतात. मुलांनाही नवीन वर्षाची खूप उत्सुकता असते. शिवाय त्यांच्यामध्ये उत्साही असतो. दररोजच्या शिक्षणामध्ये एक वेगळा अनुभव मुलांना अशा माध्यमातून दिल्यानंतर मुलांची शिक्षणातील गोडी वाढण्यासाठी हा फलदायी ठरतो. चित्रांमध्ये रंग भरण्यामध्ये मुले दंग होऊन गेली होती. आपण काहीतरी नवनिर्मिती केल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

वयानुरुप बुद्धीमत्तेला उत्तेजन व कल्पकतेला वाव देऊन गावातील प्रमुख संस्थांच्या प्रमुखांना कार्यालयात त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नववर्षांच्या शुभेच्छापत्रे दिली.गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाणे व तेथील पदाधिकाऱ्यांना शुभेच्छापत्र देण्याचा अनुभव मुलांसाठी खूपच अनोखा होता. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी मुलांच्या या गुणांचे, त्यांच्या कलेचे कौतुक करून त्यांनी ही मुलांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. चिमुकल्यांना लहान वयातच गावची कारभार करणारी संस्था ग्रामपंचायत पाहणे ,त्यांचे पदाधिकारी यांची ओझरती ओळख या माध्यमातून झाली. तसेच पोलिस हा मुलांच्या भीतीचा विषय मात्र तामलवाडी येथील पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना भेटून वर्दीतील मानवतेचे दर्शन मुलांनी अनुभवले. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने मुले त्यांच्याशी सहज जोडली गेली. शिवाय तेथील अधिकारी व कर्मचारी ही आकस्मिक मुलांच्या शुभेच्छामय भेटीने भारावून गेले. त्यांनी सर्व मुलांना पेढे, बिस्कीट ,चॉकलेटचे वाटप करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सोमदेव गोरे , योगिता माने ,प्रणिता कांबळे,सरस्वती व्हटकर,मिलन सोनवणे,रविकांत भिसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

मुलांना आनंद व ज्ञान मिळेल आणि त्यांची कल्पकता वाढीस लागावी तसेच नवीन वर्षाचे स्वागत वैशिष्टपूर्ण रीतीने करण्याच्यादृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आला. शिकण्यात वैविध्य असेल तर मुले आनंदाने ,आवडीने त्यात समरस होतात. गावातील प्रमुख अधिकारी व पदाधिकारी यांनी मुलांचे कौतुक केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्यात शिकण्याची उमेद निर्माण झाली.  - श्रीम. ज्ञानेश्वरी शिंदे -नरवडे

Related posts