पंढरपूर

‘दानशूर नागरिकांनी पुढे येण्याची गरज’ – संस्थापक अध्यक्षा सौ.वनिता सावंत

पुण्याच्या ‘ओम प्रतिष्ठान’ ने केली स्वेरीच्या दोन विद्यार्थिनींना उच्चशिक्षणासाठी आर्थिक मदत

पंढरपूर- ‘मुलींना प्रबळ आणि आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी ओम प्रतिष्ठानतर्फे ‘विद्यादान योजना’ अमलात आणण्याचा संकल्प बांधला असून या योजनेअंतर्गत विविध समाजातील आर्थिक मागास गटातील सुरवातीला जवळपास शंभर मुलींना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी ‘ओम प्रतिष्ठान’ अंतर्गत मदत करण्याचा मानस असून ही योजना मुलींच्या भविष्यासाठी उपयोगी पडणार आहे. हा स्त्युत्य उपक्रम निश्चित प्रेरणादायी असून यासाठी दानशूर नागरिकांनी पुढे येवून मदतीचा हात देण्याची गरज आहे. या योजनेअंतर्गत मुलींना उच्च शिक्षण घेऊन त्यांचे भविष्य फुलविण्यास मदत मिळणार आहे.’ असे प्रतिपादन ओम प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सौ.वनिता संदीप सावंत यांनी केले.

मुलांप्रमाणे मुलींनी देखील शिक्षण घेवून सुसंस्कारित व्हावे या हेतूने क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू करून ऐतिहासिक पाया खणला. आज स्त्री ही शिक्षण घेतल्यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्य करताना दिसत आहेत. असे असताना गरीब व होतकरू मुली ह्या उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून संस्थापक अध्यक्षा वनिता सावंत यांच्या नेतृत्वाखाली दोन जुलै २००९ साली वाल्हेरकरवाडी (चिंचवड, पुणे) मध्ये ‘ओम प्रतिष्ठान’ ची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. प्रबल आणि आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी ‘विद्यादान योजना’ राबविण्याचा संकल्प धरला असून शंभर मुलींना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी ओम प्रतिष्ठान अंतर्गत मदत करणार आहेत. ही योजना भविष्यात यशस्वी होण्यासाठी समाजातील विविध दानशूर नागरिकांच्या मदतीतून आपल्या महाविद्यालयांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनींना आर्थिक मदत करून शिक्षणास हातभार लावण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थिनींना मदत केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या समृद्धी संतोष साखरे या विद्यार्थिनीला रुपये वीस हजार तर सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या वैष्णवी लक्ष्मण जाधव या विद्यार्थीनीच्या शिक्षणासाठी रुपये पंधरा हजार असे मिळून पस्तीस हजार रुपयांचे दोन स्वतंत्र धनादेश स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्याकडे ओम प्रतिष्ठानच्या प्रतिनिधी सौ. रुपाली जीवन कराडे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले.

यावेळी त्यांच्या समवेत जीवन कराडे, स्वेरी इंजिनिअरींगचे प्रशासन अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. ‘ओम प्रतिष्ठान’ ही संस्था मागील दहा वर्षापासून गरीब आणि होतकरू विद्यार्थिनींना उच्चशिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करत आहेत. चिंचवडच्या ‘ओम प्रतिष्ठान’ ला दानशूर नागरिकांनी मदतीचा हात पुढे करणार असाल तर त्यांनी संस्थापक अध्यक्षा सौ. वनिता सावंत (मोबा.क्र.- ९१३०५९ ७७१८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. ओम प्रतिष्ठानच्या विद्यादान योजनेमध्ये पंधरा स्वयंसेवकांची टिम कार्यरत आहे. सुरवातीला वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वनवासी आश्रम शाळा आणि अशा ठिकाणी मदत कार्य सुरु होते आता या उपक्रमाबरोबरच ३ जानेवारी २०२१ या दिवशी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यादान योजना सुरु केली असून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात आठ मुलींचे उच्च शिक्षणाचे शुल्क भरून माणुसकीचा हात पुढे केला आहे. आता सुज्ञ आणि दानशूर नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. यामुळे गरीब विद्यार्थिनींचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Related posts