उस्मानाबाद  तुळजापूर

पिंपळा येथे पालकांच्या समुपदेशनाने व सहमतीने ऑफलाइन शिक्षण साठी दुसरीची मुले प्रथमच शाळेत.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – राज्यात इयत्ता पहिली ते चौथी चे ऑफलाईन वर्ग बंद आहेत. मात्र जिल्हा परिषद शाळा पिंपळा खुर्द येथील शिक्षक श्री. विठ्ठल नरवडे यांनी पालकांच्या परवानगीने दुसरीचा वर्ग सुरू केला आहे. कोरोना काळातील शासनाच्या सूचनांचा अवलंब करून प्रत्यक्ष वर्गात ऑफलाइन शिक्षणास सुरुवात केली आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती , ग्रामपंचायत व पालकांचे सहकार्य मिळत आहे. सध्या दुसरी वर्गात शिकत असलेली मुले प्रथमच ऑफलाइन शिक्षणाचा आनंद व अनुभव घेत आहेत. यासाठी काही पालकांनी स्वतःहून वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत पुढाकार घेतला तर काही पालकांना भेटून स्वेच्छेने आपण ही मुले शाळेत पाठवू शकता याची माहिती प्रत्यक्ष भेटून दिली. पालकांचा त्यास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.

लहान वयोगटासाठी श्री. नरवडे यांनी ऑनलाईनचा पर्याय शाळा बंद असताना वापरात आणला होता. मात्र या वयोगटासाठी तो प्रभावी व परिणामकारक दिसून येत नाही. तसेच यासाठी ग्रामीण स्तरावर अधिक समस्यांचाही सामना करावा लागतो. शिवाय यामध्ये शंभर टक्के प्रतिसाद ही नव्हता. त्यामुळे या वयोगटातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळून ,त्यांना शालेय प्रवाहात आणून प्रत्यक्ष ऑफलाइन पद्धतीने दिले अध्ययन अनुभव त्याची शिक्षणातील गोडी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. मुलांमध्ये शिकण्याची ऊर्मी नैसर्गिक असते प्रत्यक्ष वर्गातच या उर्मिला पोषक वातावरणाची निर्मिती करता येते. वर्गात सध्या 41 पैकी 33 विद्यार्थी उपस्थित असून दररोज मराठी, गणित व इंग्रजी या विषयाचे प्राथमिक धडे या वर्गात दिले जात आहेत. मुले वर्गात इतर मुलांसमवेत अध्ययनाचे धडे गिरवत आहेत. सध्या त्यांना त्यांच्याच वयातील मित्रांचा सहवास, संवाद व प्रत्यक्ष भेटीतून निखळ आनंद मिळत आहे.

शाळा बंद काळाचा परिणाम मुलांच्या शैक्षणिक, शारीरिक व मानसिक आरोग्यावरही झाला आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ऑफलाईन वर्गातून शिक्षण हाच प्रभावी पर्याय आहे. शिक्षक विठ्ठल नरवडे हे सुरुवातीला मुलांना शाळेची गोडी लागावी, त्यांचे मन शाळेत रमावे यासाठी विविध पर्यायांचा वापर करत आहेत. यामध्ये बडबड गीते, कविता गायन, मनोरंजक खेळ, कागद काम, कृतीयुक्त गीत याद्वारे विद्यार्थ्यांना लळा लावत आहेत.

======================
मुलांना हसत खेळत शिक्षण प्रत्यक्ष मार्गदर्शन व संवाद यातून प्रभावी अशी विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया होते. त्यांचं शिक्षण सुलभ होतं. मुलांना शाबासकी, कौतुक यांनी प्रोत्साहित करून त्यांचा शैक्षणिक प्रवास सुकर होतो. हळूहळू मुलांना शाळेची गोडी वाढत आहे. कृतीयुक्त गीते, आवडीनुसार शिक्षण यातून मुले शिकण्याचा आनंद घेत आहेत.

शिक्षक - श्री. विठ्ठल नरवडे , (पिंपळा खुर्द)

=======================

Related posts