भारत

एक तर त्यांना सोडा नाहीतर मलाही अटक करा

कोलकाता, : ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी यांना नारदा घोटाळ्यात सीबीआयने अटक केली आहे. यामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
दरम्यान, आज (दि. १७) सकाळीच या प्रकरणात एक आमदार आणि माजी मंत्री शोभन चटर्जी यांनाही सीबीआयच्या कार्यालयात नेण्यात आले होते. मात्र, अटक केलेल्या हाकिम आणि मुखर्जी यांना सीबीआयच्या ऑफिसमध्ये नेण्यापूर्वीच स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआय ऑफिसमध्ये पोहोचल्या. यावेळी ममता यांनी तेथेच आंदोलनाला सुरूवात केली. तसेच त्यांनी, जोपर्यंत आपल्या सहकाऱ्यांना सोडण्यात येत नाही किंवा आपल्यालाही अटक होत नाही. तोपर्यंत सीबीआय कार्यालय सोडणार नाही, असे म्हटले आहे.
मंत्रिमंडळातील फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी यांना नारदा घोटाळ्यात सीबीआयने अटक होताच ममता बॅनर्जी निजाम पॅलेसच्या १५ व्या मजल्यापर्यंत पोहोचल्या. जिथे सीबीआयचे अँटी करप्शन सेल कार्यालय आहे. त्यानंतर ममता यांनी आपल्या चार नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ सीबीआय कार्यालयात आंदोलनाल सुरू केले आहे. तसेच त्यांनी, जोपर्यंत आपल्या सहकाऱ्यांना सोडण्यात येत नाही किंवा आपल्यालाही अटक होत नाही. तोपर्यंत सीबीआय कार्यालय सोडणार नाही, असे सांगितल्याचे त्यांचे प्रवक्ते तथा वकील अनिंद्यो राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.दरम्यान, यापूर्वी राज्याचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी सीबीआयला फिरहाद हाकिम यांच्यासहीत सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांच्या विरोधातील कारवाईला मंजुरी दिली होती. त्यावेळी हाकिम म्हणाले होते की, ‘आमचा विश्वास आहे की आम्हाला क्लीन चीट मिळेल. मी न्यायालयावर विश्वास ठेवतो. हे प्रकरण न्यायालयात गेले, ही चांगली गोष्ट आहे. मी तिथे माझी बाजू मांडेन आणि मला न्याय नक्की मिळेल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related posts