पंढरपूर

‘स्वेरीचे डॉ. रोंगे सर प्रत्येकाला हीरा बनवतात.’ -नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले

स्वेरीचे प्रा.डॉ. प्रशांत पवार यांचा पंढरपूर नगरपालिकेतर्फे सत्कार संपन्न

पंढरपूर –
‘शिक्षण क्षेत्रात चौफेर प्रगती करत असलेल्या स्वेरीचे कौतुक जेवढे करावे तेवढे कमीच आहे. त्यातून डॉ. बी.पी. रोंगे सर हे अस्सल हिऱ्याचे पारखी आहेत. डॉ. पवार सरांचा भारतातून प्रथम क्रमांक येणे हे पंढरपुरकरांसाठी विशेष अभिमानाची गोष्ट आहे. स्वेरीमध्ये खूप लांबून विद्यार्थी येतात आणि शिक्षण घेतात. त्या प्रत्येकांची प्रगती होत असते. डॉ. रोंगे सरांनी दाखवलेला विश्वास डॉ.प्रशांत पवार यांनी सार्थ करून दाखवला आणि डॉ. पवार सरांना भारतातून प्रथम क्रमांक मिळाला. म्हणुन, डॉ.रोंगे सर हे प्रत्येकाला हिरा बनविताना दिसतात.’ असे प्रतिपादन पंढरपूरच्या प्रथम नागरिक व नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांनी केले.

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (ए.आय.सी.टी.ई ) प्रथम क्रमांकांचा विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर अवार्ड मिळाल्याबद्दल पंढरपूर नगरपरिषदेतर्फे झालेल्या बैठकीत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सध्याच्या कोरोना महामारीमुळे खूप गर्दी करून सत्कार करण्याऐवजी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी मध्ये येऊन डॉ.प्रशांत पवार यांचा सत्कार करण्याचे ठरविले आणि मा.डीराज सर्वगोड व काही पदाधिकारी घेऊन, डॉ.पवार यांना सन्मानपत्र देऊन व शाल, श्रीफळ आणि मानाचा फेटा घालून सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने त्या स्वेरीबद्दल गौरवोद्गार काढत होत्या. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग च्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांनी नगराध्यक्षा सौ.भोसले, मा. डीराज सर्वगोड व नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. डॉ. पवार यांनी पुरस्काराविषयी आपले मनोगत व्यक्त करून सर्व पंढरपूरकर, सर्व नगरसेवक, मा. मुख्याधिकारी, नगरपरिषद प्रशासन व जिल्ह्याचे नेते मा.प्रशांत परिचारक यांचे आभार मानले. नगरपरिषदेने दिलेल्या अभिनंदनाच्या सन्मान पत्रात ‘पंढरपूर तालुक्यातील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील प्राध्यापक डॉ. प्रशांत पवार यांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून विश्वेश्वरय्या बेस्ट टिचर अवॉर्ड प्रथम क्रमांकाने देऊन प्रा.डॉ.प्रशांत पवार यांच्या शिक्षण व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली व त्यांचा सन्मान करण्यात आला. सदरचा पुरस्कार पंढरपूरकरांच्या माना उंचावणारा व अभिमानास्पद असल्याने प्रा.डॉ.प्रशांत पवार यांचे पंढरपूर नगरपरिषदेतर्फे सर्वानुमते अभिनंदन करण्यात येत आहे.’

याकामी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या विशेष कौशल्याची दखल घेऊन एकमताने अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. यासाठी नगरसेवक मा.ज्ञानराज (डीराज) सर्वगोड यांनी सूचना मांडली तर याला मा.सुरेश नेहतराव यांनी अनुमोदन दिले. सन्मानपत्र नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत स्वीकृत नगरसेवक मा. डीराज सर्वगोड, समाजसेवक आदम बागवान,यश भोसले व स्वेरीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी, प्राध्यापक वर्ग आदी उपस्थित होते. स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम. एम. पवार यांनी सूत्रसंचालन केले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभाग प्रमुख प्रा.करण पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related posts