पंढरपूर

मुंढेवाडीतील पूरग्रस्तांना डॉ.बी.पी. रोंगे सरांची मदत

मुंढेवाडीच्या प्रत्येक संकटावेळी स्वेरीच्या डॉ.रोंगे यांची मिळते मदत – चेअरमन नारायण मोरे

पंढरपूर:
‘मुंढेवाडीमधील नागरीकांवर ज्या ज्या वेळी संकट कोसळले आहे त्या त्या वेळी स्वेरीच्या डॉ. रोंगे सरांनी वेळ काळ न पाहता सुख- दुखात मदतीसाठी धाव घेतलेली आहे, हा इतिहास आहे. अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे. हे पाहून शिक्षणतज्ञ डॉ. बी.पी. रोंगे सरांनी माणुसकीचा हात पुढे केला असून त्यांनी येथील पूरग्रस्तांना खाद्य पदार्थ व अन्नधान्याची मदत केली आहे.’ असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नारायण मोरे यांनी केले.

मुंढेवाडी (ता. पंढरपूर) मधील महापूर व अतीवृष्टीने बाधित झालेले नागरिक व त्यांच्या कुटुंबियांना खाद्य पदार्थ व अन्नधान्याची मदत करून डॉ. रोंगे सरांनी ‘माणुसकी जिवंत आहे’ हे दाखवून दिले आहे. गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी मुंढेवाडीतील दोनशे पूरग्रस्त नागरिकांना ही मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. प्रारंभी गावचे पोलीस पाटील शरद मोरे म्हणाले की, ‘कोरोना आणि पाऊस यामुळे परिस्थती नाजूक बनली आहे. पुरामुळे शेतीचे नुकसान झाले असून जनावरे दगावली, साहित्यांचे नुकसान झाले. अशा दयनीय प्रसंगी डॉ. रोंगे सरांनी मोलाची मदत केली आहे.’ यावेळी स्वेरीचे डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘सध्याची परिस्थिती पाहता गाव खूप संकटात आहे. ही बाब मनाला वेदना देणारी आहे. त्यामुळे, काहीतरी मदत करावी या भावनेने मी इथं आलो आहे. आपण संयम बाळगून परिस्थितीला धैर्याने सामोरे जा. त्याचप्रमाणे सध्याची परिस्थती पाहता स्वेरीमधील अभियांत्रिकी, फार्मसी व एम.बी.ए. या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण देण्यासाठी गरजू पूरग्रस्तांच्या पाल्यांना ‘कमवा व शिका’ योजनेतून प्रवेशासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल.’ असेही डॉ. रोंगे यांनी सांगितले. यावेळी सरपंच सौ. दमयंती पांडुरंग मोरे, ज्ञानेश्वर घाडगे, माजी सरपंच पांडुरंग मोरे, युवा नेते सचिन मोरे, बाबासाहेब मोरे, दिलीप मोरे, तानाजी मोरे, दत्तात्रय मोरे, विजय मुळे, शशिकांत मोरे, बालाजी आसबे, तात्यासाहेब मोरे, अक्षय मोरे, विशाल मोरे शशिकांत बिस्किटे यांच्यासह मुंढेवाडीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts