पंढरपूर

कर्नाटक येथील दानेश्वर महाराजांच्या वतीने रोज एक लाख भाविकांना अन्नदान.

सचिन झाडे

पंढरपूर –  
कर्नाटक येथील बंडीगणी मठाचे श्रीमंत दासोहरत्न चक्रवती दानेश्वर आप्पाजी महाराज यांच्या वतीने कार्तिकी वारी निमित्त आलेल्या भाविकांना महाप्रसाद अन्नदान करण्यात आले. या महाप्रसादाचे आयोजन १३  ते १६ नोव्हेंबर पर्यंत येथील गोपाळपूर रोड दर्शन बारी जवळ रिद्धी सिद्धी गणपती मंदिर येथे करण्यात आले आहे. यासाठी ५०० सेवेकरी रात्रंदिवस सेवा देत आहेत.

यामध्ये भल्या पहाटे चहा-बिस्कीट नाश्त्यासाठी मसालेभात, गोड बुंदी तर जेवणात भात,भाजी, गव्हाची खीर या खाद्यपदार्थाचे वाटप करण्यात आले तर कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांना शाबुदाणा खिचडी, खजूर, शेंगदाणे, केळी आदी उपवासाचे पदार्थ वाटप करण्यात आले.

या अन्नदान कार्यक्रमास श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी भेट दिली व चक्रवर्ती दानेश्वर आप्पा महाराज यांचे मंदिर समितीच्या वतीने आभार मानले.

कर्नाटक येथील श्री बसवगोपाल नीलमणिक बंडीगणी मठाचे चक्रवर्ती दानेश्वर आप्पा महाराज यांच्या वतीने कर्नाटक आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील आणि जत्रा यात्रांमध्ये लाखोंच्या संख्येने भाविकांना अन्नदान केले जाते.

पंढरपूर येथे गेली २२ वर्षांपासून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांना अन्नदान केले जाते. कोरोनामुळे दोन वर्षे खंडित झालेली अन्नदानाची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे. त्यांच्या या अन्नदानाचा लाभ आलेले भाविक मोठ्या प्रमाणावर घेत असतात.

Related posts