महाराष्ट्र

कुणी बेड देता का बेड?

मुंबईत आयसीयू बेड्ससाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांवर ‘कुणी बेड देता का बेड?’ अशी म्हणण्याची वेळ झाली आहे. मुंबई शहरासह उपनगरातील अनेक रुग्ण शुक्रवारी दुपारी वांद्रे-कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटरवर धडकले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येमुळे आयसीयू बेड्सची कमतरता भासू लागल्याने सर्व वॉर्डमधून महापौर किशोरी पेडणेकर यांना फोन येऊ लागले. महापौरांच्या निकटच्या पदाधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मुंबईतील बहुतांश वॉर्डमधून नगरसेवक आणि बड्या पदावरील कार्यकर्ते कोरोना रुग्णांना बेड हवा असल्याने फोन करत आहेत. ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सची चणचण भासत असल्याचे फोन सर्वात अधिक असल्याचेही संबंधित पदाधिकार्‍याने सांगितले.
विक्रोळीतील गंगुबाई यादव ताप आला म्हणून स्थानिक रुबी क्लिनिकमध्ये उपचारासाठी भरती झाल्या होत्या. त्यात शुक्रवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना भरती कऱण्यासाठी मुलगा विनय यादव शुक्रवारी दुपारी 12 वाजल्यापासून प्रयत्न करत होता. त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने ऑक्सिजन किंवा आयसीयू बेड्सची गरज होती. महापालिकेने दिलेल्या वॉररूमला संपर्क केला असता विनय यांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. दुसर्‍या ठिकणी बेड उपलब्ध करून देण्यासाठी किती वेळ लागेल, याची खात्रीही प्रशासनाने दिली नाही. सायंकाळी सहा वाजेपर्यंत महापालिकेकडून म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याने विनय यांनी फोनाफोनी सुरू केली. भायखळ्यातील रिचर्डसन क्रुडास मिल येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये साधे बेड्सचे असल्याचे सांगण्यात आले. मात्र आयसीयू बेड्ससाठी वांद्रे-कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटरशी संपर्क साधण्यास सांगितले.

अखेर विनय यांनी स्वतःच बीकेसीमधील जम्बो कोविड सेंटर गाठले. तिथे उसळलेली गर्दी पाहून त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. तरीही प्रचंड धडपड केल्यानंतर सायंकाळी 7 वाजता नोंदणी करून बेड उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. इतक्यात त्यांच्यामागील शुक्लकाष्ट संपले नव्हते. खासगी रुग्णवाहिका करून आईला विक्रोळीवरून यादव कुटुंबाने बीकेसी जम्बो कोविड सेंटर गाठले. मात्र रात्री 9.30 वाजले तरी रुग्णास भरती कऱण्याची प्रक्रिया संपली नव्हती.

शिवसेना नेत्याचेही हाल

मुंबई महापालिकेत बड्या पदावर असलेल्या एका शिवसेना नेत्यानेही बेड्सची चणचण असल्याचे मान्य केले. नाव न सांगण्याच्या अटीवर संबंधित शिवसेना नेत्याने सांगितले की, माझ्या स्वतःच्या बहिणीला भरती करण्यासाठी बेड उपलब्ध नाही. त्यात सर्वसामान्यांचे हाल विचारू नका. एकूणच शिवसेना नेत्याला अशी समस्या भेडसावत असेल, तर मुंबईत सर्व आलबेल असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा कितपत खरा आहे, हा एक प्रश्नच आहे.

Related posts