दक्षिण सोलापूर

हत्तरसंगकुडल येथील श्री संगमेश्‍वराच्या सान्निध्यात रंगली विकास आणि भाषेची चर्चा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम – सोलापूर सोशल फाऊंडेशनचा उपक्रम.

अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर विशेष प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या हत्तरसंग कुडल येथील श्री संगमेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात सोलापूर सोशल फाऊंडेशनने आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या कार्यक्रमात मराठी भाषेसोबतच कुडल तीर्थक्षेत्र तसेच पर्यटन स्थळाच्या विकासाचीही चर्चा रंगली.
कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दक्षिण सोलापूरचे आमदार माजी सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख यांनी भूषविले होते.

या कार्यक्रमात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर कोळेकर यांचे प्रमुख भाषण झाले. त्यांनी हत्तरसंग कुडल येथे असलेल्या मराठी भाषेतल्या पुरातन शिलालेखाचे महत्व सांगितले. भीमा आणि सीना या दोन नद्यांचा संगम असलेल्या या प्राचीन भागात दोन संस्कृती आणि भाषांचाही संगम झाला आहे असे ते म्हणाले.
भाषा संवर्धन पंधरवड्याचे कार्यक्रम साधारणत: शासकीय पातळीवर आणि साहित्य संस्थांकडून साजरे होतात पण हा कार्यक्रम सोलापूर सोशल फाऊंडेशनने आयोजित केला आहे याविषयी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दिलीप स्वामी यांनी फाऊंडेशनचे कौतुक केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आधी संगमेश्‍वर मंदिराची पाहणी केली आणि परिसराच्या पर्यटन विषयक विकासाची माहिती करून घेतली.
आपण सर्वांनी आपल्या नित्य व्यवहारात मराठीचा जास्तीत जास्त वापर आवर्जुन केला पाहिजे तर ही भाषा केवळ विकसितच होईल असे नाही तर ती जागतिक स्तरावर जाईल असे त्यांनी प्रतिपादन केले.

संगमेश्‍वर मंंदिर विकास समितीचे सदस्य श्री.संगप्पा केरके यांनी सुरूवातीला निवेदन केले. या परिसराच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेखाली मंजूर झालेल्या निधीचा एक भाग मिळाला असून लॉकडाऊनमुळे त्याचा मोठा हिस्सा अजून येेणे आहे तरी तो मिळावा अशी मागणी त्यांनी केली. त्यावर श्री. दिलीप स्वामी यांनी हा निधी मिळवून देण्याकामी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आणि गावाचा ग्रामविकास आराखडा तयार करावा अशी सूचना केली.
मा. सुभाषबापू देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या परिसराच्या विकासातून गावच्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे असे प्रतिपादन केले. या विकासासाठी राज्य पातळीवरून आपण १५ ते १६ कोटी रुपये मिळवून दिले आहेत. आता ग्रामविकास आराखडा तयार करून जास्तीतजास्त निधी मागावा असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला जोडून शिवरंजनी ग्रुपचा मराठी गीतांचा आम्ही मराठी हा कार्यक्रम सादर करण्यात आला.कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, डॉ.नरेन्द्र काटीकर,बदिउज्जमा बिराजदार,डॉ.चनगोंडा हविनाळे,तहसीलदार उज्वला सोरटे,गटविकास अधिकारी राहुल देसाई,हणमंत कुलकर्णी, श्री संगमेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष षडाक्षरी बिराजदार, सरपंच अनिल पाटील,फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटिल, समन्वयक विपुल लावंड, संतोष उकरंडे,सुशीला ख्यामगोंडे,आदी मान्यवर आणि समस्त हत्तरसंगकुडल ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्‍वेता हुल्ले यांनी सूत्रसंंचालन केले तर फाउंडेशन सल्लागार प्रा.डॉ.नरेंद्र काटीकर यांनी आभार मानले.

Related posts