Blog

दर्श वेळा अमावस्या….

साईनाथ जगन्नाथ गवळी,
विभागीय संपादक – मराठवाडा विभाग
——————————————————

मराठवाडा आज जरी विकासाच्या दृष्टीने मागास असला तरी सांस्कृतिक श्रीमंती वारेमाप आहे. राज्याच्या कोणत्याच भागात किंबहुना संपूर्ण मराठवाड्यात सुद्धा होत नसलेल्या सणांची परंपरा पाळली जाते आहे. कोणत्याही पुराणात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला एक सण म्हणजे वेळ अमावस्या….. किंवा मार्गशीर्ष दर्शवेळा अमावस्या..

गावातील जुनी जाणती लोकं ज्याला ‘येळवस जवळ आली किंवा ‘येळवशीला गावाकड येणार हायस का’ असा अपभ्रंश करून आपुलकीने वापरतात… हा सण हिरवाईचा अपूर्व सोहळा….

आज २८ डिसेंबर रोजी मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांपैकी २ जिल्हे संपूर्ण (लातूर आणि उस्मानाबाद) आणि बीड व नांदेड जिल्ह्यांचा काही भाग संपूर्ण  शेतात असतो. मागच्या दोन दिवसापासून याची घराघरात जय्यत तयारी सुरु असते… तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग हा सगळा रानमेवा…. हरभरे पिठात कालवून चिंच आणि अंबिवलेल्या ताकाच्या पाण्यात शिजवलेली ही भज्जी म्हणजे अफलातून भाजी…… चार दिवसाचे ताक ज्वारीच्या पिठात अंबवून जिरा फोडणी दिलेल हे पेय जे तांब्यावर तांबे रिचवले तरी प्यायची इच्छा होते ते अंबिल ( काही जणांचे तोंडही सुजतात दुस-या दिवशी जादाचा डोस झाल्यामुळे ). भल्या थोरल्या भाकरी…… गव्हाची खीर एका शेतात २० ते २५ लोक जेवतील एवढा स्वयंपाक वाजत गाजत घरातून डोक्यावरुन शेतावर निघतो. शेतात झोके बांधून सज्ज असतात ….!!!

काय आहे परंपरा …….!!!

भारतीय व्दिपकल्पात सिंधू संस्कृतीपासून नदीचे जलपूजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा , यमुना , गोदावरी , सरस्वती , नर्मदा , सिंधु आणि कावेरी या त्या सात नद्या ( सप्त सिंधू ) भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता होती (नंतर आपण धार्मिक कर्मकांडात अडकून कृतघ्न झालो हे अलाहिदा ). त्याच सप्तसिंधू मातृका म्हणून पुजण्याची परंपरा सुरु झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्त सिंधूचे प्रतिक म्हणून पुजल्या जावू लागले. विहिरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगड पुजण्याची परंपरा आहे तिला मराठवाड्यात आसरा म्हणून ओळखले जाते. आसरा म्हणजे तूच आमची राखण करणारी सहारा देणारी , पाणी पाजणारी. याच आसराची पुजा वेळ अमावस्येच्या दिवशी प्रत्येक शेतात मस्त ज्वारीच्या कडब्याच्या पेंड्याची कोप करुन भक्ती भावाने केली जाते.

काही ठिकाणी सहा दगड पुजले जातात जसे की लातूर,औसा,उमरगा,लोहारा,निलंगा या तालुक्यात.. हे सहा दगड म्हणजे पाच पांडव अन द्रौपदी असे मानण्यात येते तर तुळजापूर,उस्मानाबाद,परंडा भागात सातवा दगड पण पुजतात.. तो कोणी सूर्यपुत्र कर्ण म्हणून तर कोणी कुंती म्हणून(पण ही आख्यायिका धार्मिक कर्मकांडाशी निगडीत होती हे सत्य).

तर नंतर सकाळी पूजा करुन आणि हा सगळा सुग्रास भोजनाचा भोज चढवून मोठी पंगत बसते….. जेवणाआधी अंबिल एका तांबुल्यात घेऊन, शेतातल्या पिकाचा पान त्यात बुडवून प्रत्येक शेतकरी बांधावरून अंबिल शेतात उडवत घोषणा देत जातो… ‘हर हर हर हर महादेव’ ‘हरमलो रे भरतराज्यो हरमलो’ ‘येतासाहेब(ग्रामदैवत वेताळसाहेब) के दो चार हो दिन’ या त्यापैकी काही….

जेवण करताना आपण किती खातोय याचे भान राहत नाही. प्रत्येकाच्या कोपीला जावून भज्जीचा अस्वाद घेण्याचा आग्रह होतो. तो टाळता येत नाही. पोटाला तडन लागते. जेवणाच्या पात्रावरुन उठून झोक्यावर जावून झोका खेळायचे खाल्लेले जिरवण्याचा प्रयत्न करायचा आणि पुढे ….१२ बलुतेदार , आठरा आलुतेदार यांनाही आग्रहाने हा रानमेवा खावू घातला जातो. संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करुन रब्बीचा गहू, हरभरा याच्या वावराला तो पेटवून रान ओवाळून काढायचे आणि तोच टेंबा मिरवत जावून गावातील मंदिराच्या समोर टाकायचा मोठी आग करुन ती शमली की तिच्या राखेतून विस्तव असतानाच ती ठोकरुन घरी जायचे. असा मनमोहक सण आहे. त्यानंतर घरातले कर्ते पुरुष माळेगावच्या खंडोबाच्या जत्रेला निघून जायचे….. ही जत्रा देशभरात वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. मोठा घोड्याचा बाजार ( माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांचे दैवत. त्यांचे घोडे , कै. गोपीनाथराव मुंडेंचे घोडे इथे येत ). गाढवांचा बाजार , सगळ्या भटक्या जमातींची पंचायत यावेळी इथे भरते. देशभरातले हिजडे दर्शनाला येतात ( हिजड्याचे माळेगाव अशीही ओळख ). तमाशाचे मोठ मोठे फड….. यामुळे या जत्रेला पुरुष मंडळीच्या दृष्टीने ख-या अर्थाने चांगभलं ….. असा हा सण आणि त्याची परंपरा आहे..

जसे बैलाच्या कष्टाप्रति कृतज्ञता म्हणून बैलपोळा साजरा होतो, तसेच शेताच्या आणि पाण्याच्या प्रति कृतज्ञता म्हणून हा सण एक उत्कृष्ट परंपरा आहे… याचा उगम कधी कसा झाला ठाव नाही.. पण अनेक राज्ये आली गेली, नंतर बराचसा काळ निजामाच्या अंमलात असणाऱ्या या भागाने मात्र हे वेगळेपण जपले आणि समृद्ध वारसा जपला..!!

इतिहासात दुष्काळाने, महामारीने, अत्याचाराने गावं च्या गाव ओस पडलेली उदाहरणं आहेत… पण वेळा अमावस्येला आया बहिणी चिमुकल्यांसकट सगळी दिवसभर शेतात असतात अन गावं रिकामी.. तेंव्हा राहून राहून वाटतं की
गावं ओस पडावी तर अशी…!!!!

Related posts