पंढरपूर

स्वेरीच्या मैदानावर क्रिकेट सामने सुरू

दि.२३नोव्हेंबरपर्यंत चालणार सामने

सचिन झाडे
पंढरपूर-

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या भव्य मैदानावर दि.१३ नोव्हेंबर पासून क्रिकेटचे सामने सुरु झाले असून या क्रिकेटच्या सामन्यात तब्बल बारा क्रिकेट संघांनी सहभाग घेतला आहे. याचा अंतिम सामना येत्या सोमवारी, दि. २३ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती पंढरपुरच्या छत्रपती क्रिकेट ॲकॅडमीचे संचालक रवी निंबाळकर यांनी दिली.

छत्रपती क्रिकेट अकॅडमी, पंढरपूर व श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संयुक्त विद्यमाने स्वेरीच्या भव्य मैदानावर क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले असून स्वेरीच्या मैदानावरील सामने पाहणे हे नेहमीच औत्सुक्याचे ठरते.

स्वेरीचे संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व अकादमीचे अध्यक्ष व पंढरपूर पोलीस ठाण्याचे पो.कॉ.शिवाजी पाटील, अकॅडमीचे सहकारी योगेश बडवे यांच्या सहकार्याने हे सामने सुरु आहेत.

या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये परभणी, गंगाखेड, सोलापूर, अकलूज, पंढरपूर आणि सांगली या सहा ठिकाणच्या तब्बल बारा संघांनी सहभाग नोंदविला आहे. सर्व संघात राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असून उत्तम खेळीने सामन्याचा निकाल बदलवणारे खेळाडू आहेत. त्यामुळे सर्व सामने अटीतटीचे होतील अशी चिन्हे दिसत आहेत.

यामध्ये परभणी संघाकडून खेळत असलेला सोलापूरचा आर्शीन कुलकर्णी हा खेळाडू केडन्स पुणे, महाराष्ट्र क्रिकेट संघाचा सोळा वर्षे वयोगटातील क्रिकेट संघाचा उपकर्णधार आहे तर अकलूज संघातील अभय लावंड हा खेळाडू १४ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अहमदनगर संघाकडून चमकतोय.

२२ यार्ड क्रिकेट अकॅडमीचे दीपक सोळंके हे या सामन्यांचे कोच म्हणून काम पाहत आहेत. सोळंके यांनी अक्षय पासकर सारखे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार केले असून अकॅडमीच्या माध्यमातून नवीन खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करत आहेत. स्वेरीच्या मैदानावर भरण्यात आलेले सामने हे १७ वर्षाखालील मुलांचे असून दि.१३ नोव्हेंबर पासून सुरु झालेले असून दि. २३ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहेत. हे सामने लेदरबॉलने खेळविले जात असून दररोज प्रत्येकी २० षटकांचे दोन सामने होतात. सर्व सामने दिवसा जरी खेळवत असले तरी रात्र सामन्यांची सोय देखील स्वेरीने उत्तम रित्या केली असून मैदानच्या चारही बाजूंना उंच पोलवर हाय मास्ट व्होल्टेज दिवे बसविण्यात आले आहेत.

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक खेळाडू घरी बसून होते. अशा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळावे या हेतूने हे सामने भरविण्यात आल्याचे छत्रपती क्रिकेट अकॅडमीचे संचालक रवी निंबाळकर यांनी सांगितले. स्वेरीच्या भव्य मैदानाकडे पाहिले असता कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाची तुलना केली जाते. त्यामुळे याठिकाणी भविष्यात राष्ट्रीय सामने होतील असेही सामन्याचे कोच दीपक सोळंके म्हणाले.

Related posts