तुळजापूर

सन 2019 मध्ये शेतक-यांना केलेल्या अनुदान वाटपात कोट्यावधीचा भ्रष्टाचार

साईनाथ गवळी
उस्मानाबाद/तुळजापूर प्रतिनिधी.

सन 2019 मध्ये राज्यातील अतिवृष्टीमुळे पात्र शेतक-यांना देण्यात आलेल्या अनुदान वाटपात कोट्यावधी रुपयेचा भ्रष्टाचार झालेला असून यासाठी स्वतंत्र चौकशी पथक (एसआयटी) नेमणुक करुन चौकशी करावी व दोषींविरुध्द कायदेशीवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्यासह विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई म्हणून सन 2019 मध्ये देण्यात आलेल्या अनुदान वाटपात राजकीय नेते मंडळी, अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचे निदर्शनास आले असून या अनुदान वाटपात पुढीलप्रमाणे त्रुटी दिसुन आले आहे.

गावनिहाय खुप मोठ्याप्रमाणात पंचनाम्यात चुकीचे अहवाल सादर करण्यात आले. तसेच ज्या शेतक-यांनी पीक कर्ज घेतलेले नाही मात्र अतिवृष्टीमुळे वास्तविक झालेल्या शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. ज्यामुळे खुप शेतकरी अनुदानाच्या लाभापासुन वंचित राहिलेले आहेत. शासनाचे शासकीय आदेश निर्देशित असतानाही तालुकानिहाय व गावनिहाय‍ अतिवृष्टी लाभधारकापैकी 60 ते 70 टक्के शेतक-यांच्या याद्या किंवा सूची शासकीय पोर्टलवर हेतूपुरस्पर अपलोड करण्यातच आल्या नाहीत. काही राजकीय नेते मंडळीच्या इशा-यावरुन प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी ज्या लोकाकडे शेतीचे सातबारा नाहीत अशा लोकाकडून पैसे घेऊन त्यांच्या नावे जमिनी दाखवुन खोटे पंचनामे करण्यात आल्याचे आरोप करुन त्यांनाही चुकीच्या पध्दतीने अतिवृष्टी लाभधारक घोषित करुन लाभ देण्यात आलेला आहे. ज्या शेतक-यांचे क्षेत्र जास्त आहेत त्यांचे क्षेत्र कमी दाखविण्यात आले होते. त्यामुळे खुप सा-या शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना हक्काच्या लाभापासुन वंचित ठेवण्यात आले आहे. जे शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांच्याकडे जास्ती जमिन उपलब्ध आहेव असे दाखवुन त्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळवून देण्यात आला व त्या शेतक-यांकडून लाभाचे पैसे संबंधित कर्मचा-यांनी मागवुन विभागून घेतल्याचे निदर्शनास आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Related posts