भारत

देशात गेल्या चार महिन्यांतील कोरोनाचा नवा उच्चांक, ३९ हजार ७२६ नवे रुग्ण

नवी दिल्ली : कोरोना संसर्गातील देशातील स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली असून दैनिक रुग्णसंख्या वाढीच्या बाबतीत मागील चार महिन्यांतला सर्वाधिक आकडा गाठला गेला आहे. गत चोवीस तासांत देशभरात ३९ हजार ७२६ नवीन रुग्ण वाढले आहेत. ताज्या आकडेवारीवरुन कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी १५ लाख १४ हजार ३३१ पर्यंत वाढली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून शुक्रवारी देण्यात आली.
सलग नवव्या दिवशी रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आता २ लाख ७१ हजार २८२ वर पोहोचली असून संसर्गाचे प्रमाण २.३६ टक्के इतके आहे. रिकव्हरी दर कमी होऊन ९६.२६ टक्क्यांवर आला आहे. गत चोवीस तासांत रुग्णसंख्या ३९ हजार ७२६ ने वाढली. हा गेल्या ११० दिवसातला सर्वात जास्त आकडा आहे. चोवीस तासांत १५९ लोकांचा मृत्यू झाला.
यानंतर देशातील एकूण मृतांची संख्या १ लाख ५९ हजार ३७० वर पोहोचली आहे. यापूर्वी २९ नोव्हेंबर २०२० रोजी रुग्णसंख्येत ४१ हजार ८१० ने भर पडली होती. कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांचा आकडा वाढून १ कोटी १० लाख ६७९ वर पोहोचला आहे. मृत्यू दराचे प्रमाण १.३८ टक्के इतके आहे. आतापर्यंत आकडेवारीनुसार २३ कोटी १३ लाख ७० हजार ५४६ चाचण्या घेण्यात आल्या असून गुरुवारी १० लाख ५७ हजार ३८३ चाचण्या घेण्यात आल्या.
रुग्णसंख्या वाढीच्या बाबतीत महाराष्ट्राने घेतलेली आघाडी कायम आहे. गत चोवीस तासांत महाराष्ट्रात २५ हजार ८३३ रुग्णांची भर पडली. कोरोनाचे संकट सुरु झाल्यापासूनचा एका दिवसातला हा सर्वात जास्त आकडा आहे. एकूण रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्ण महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यातले असल्याचे अलिकडेच आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.
भारतात आतापर्यंत ब्रिटन, दक्षिण आफ्रिकन आणि ब्राझिलियन स्ट्रेनचे चारशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. यातील ब्रिटन स्ट्रेन सर्वात घातक असल्याचे आढळून आले आहे. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना केंद्र सरकारने लसीकरणाच्या कामालाही वेग आणला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ९३ लाख ३९ हजार ८१७ लोकांना लस देण्यात आली आहे.

Related posts