उस्मानाबाद  तुळजापूर

जिल्ह्यात हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधक अभियान सुरू.

प्रतिक शेषेराव भोसले
सलगरा, प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या अंतर्गत निर्धार समानतेचा या प्रकल्पाच्या माध्यमातून 1 ते 15 मार्च या कालावधीत तुळजापूर व लोहारा तालुक्यातील तीस गावात बालविवाह प्रतिबंधक हे अभियान राबविले जात आहे. वाढत्या बालविवाहावर प्रतिबंध करण्यासाठी हॅलो मेडिकल फाउंडेशनने या अभियानाची सुरुवात केली आहे.

यामध्ये कलापथकाच्या माध्यमातून पथनाट्य, गाणी, पोवाडे, गावकऱ्यांच्या बैठका, किशोरवयीन मुलींच्या बैठका, युवक बैठका, गावकऱ्यांशी सुसंवाद आदींद्वारे जनजागृती केली जात आहे. या अभियानासाठी तुळजापूर तालुक्यातील 15 आणि लोहारा तालुक्यातील 15 अशी एकुण 30 गावे निवडण्यात आली आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे 2020 मध्ये झालेल्या एकूण विवाहा पैकी मराठवाड्यात जवळपास 50% विवाह बालविवाह झाले असल्याचे हॅलो मेडिकल फाऊंडेशन या संस्थेला त्यांच्या अभ्यासातून निदर्शनास आले. या बाबत संबंधित सर्व विभागांची दिनांक 17 फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सुद्धा सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

या अभियानासाठी डॉ.शशिकांत अहंकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बसवराज नरे, सतीश कदम, श्रीकांत कुलकर्णी, नागिनी सुरवसे, वासंती मुळे, अनुराधा पवार, शिवानी बुलबुले, अनुराधा जाधव, स्वाती पाटील, समाधान कदम, प्रदीप पाटील, राजू कसबे, संतोष डोलारे, रमेश पाटील आदी परिश्रम घेत आहेत.

Related posts