Blog

ह्या कसल्या परंपरा . . . ?

ह्या कसल्या परंपरा . . . ?
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

नुकताच दसरा महोत्सव पार पडला.त्यात प्रचंड प्रमाणात आपट्याच्या झाडाची कत्तल करीत ती पानं सोनं म्हणून वापरण्यात आली.कारण सोनं म्हणून खरं सोनं आपण घेवू शकत नसल्यानं त्याला पर्याय म्हणून आपट्याची पानं वापरण्याची पद्धती.हीच पद्धती आपली परंपरा ठरली.कारण झाडांना जीव नसतो.हे आधीच्या लोकांना वाटायचं.
असलीच परंपरा पोळा या सणालाही आहे.पोळ्याला कित्येक झाडांची कत्तल करीत पळसाच्या डहाळ्या घरासमोर मेढ्या म्हणून लावतात.दिवाळीही आमची अशाच झाडाची कत्तल करुनच साजरी होते.दिवाळीला सिंदीच्या फांद्या किंवा केळीचे खांब लावले जातात.परंपरा आहे की त्या फांद्या किंवा ते खांब दारात लावल्यानं लक्ष्मी येते.होळीलाही होळी जाळण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते.नव्हे तर कितीतरी झाडांचा वध केला जातो.परंतू झाडांची पानंच नाही तर अख्ख झाडंही जीवंत असतं हे जगदीशचंद्र बोस यांनी १९०१ मध्ये सिद्ध केलं.त्यासाठी त्यांनी लाजाळूच्या झाडांचा वापर केला.
झाडांनाही जीव असताे.कारण झाडांनाही अन्न,पाणी व हवा लागत असते.झाडांनाही उष्णतेची गरज असते.ते सुर्यापासून उष्णता मिळवून स्वतः प्रकाशसंश्लेषण प्रक्रीयेद्वारे स्वतःचे अन्न स्वतःच निर्माण करीत असते.मग अशा जीव असणा-या झाडांचा ते बोलत नसल्यानं परंपरा म्हणून कत्तल करणे बरोबर नाही.
मुख्य म्हणजे आपला आनंद परंपरेच्या नावानं द्विगुणीत होतो.आपल्याला वाटते की झाडांचा उपयोग केल्यानं लक्ष्मी येते.पण खरंच विचार केल्यास कुणाला वेदना दिल्यास वा झळ पोहोचविल्यास लक्ष्मी कशी येवू शकेल! तसेच जर असे केल्याने लक्ष्मी जर येत असेल,तर ती लक्ष्मी कसली! झाडांनाही भावभावना आहेत.त्यांनाही दुःख होतं.पण ते आपल्याला कळत नाही.कारण आपण त्यांच्या बिरादरीतील नाही.आपण असा विचार केला की ज्याप्रमाणे आपण झाडांची एक फांदी तोडतो आणि आपल्या कामात लावतो.त्याप्रमाणे कोणी आपल्या शरीराचा एखादा अवयव करुन कामात लावला तर कसं वाटेल आपल्याला?वेदना होणार की नाही.तीच स्थिती झाडांचीही आहे.आपण परंपरा साज-या करण्यासाठी त्यांचा वापर करतो.राजरोषपणे त्या मुक्या झाडाच्या फांद्या रस्त्यारस्त्यावर विकल्या जातात.झाडं तोडणं बंदी असतांनाही ह्या झाडाच्या फांद्या चौकाचौकात दिवाळी,दसरा आणि पोळ्याला विकल्या जातात.एवढेच नाही तर नागद्वारी कढया करतांना जी पानं झाडं स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी वापरतात.तीच पानं जेवन करण्यासाठी वापरली जातात.ही शोकांतिका आहे.
अशा अवैध कत्तलीने आज जंगलं कमी होत आलेली असून त्याचा परीणाम पर्यावरणावरही होत चाललेला आहे.पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललेला आहे.पाऊस बरोबर पडत नाही.कुठे दरड कोसळते तर कुठं भुकंप.सा-याच पर्यावरण असमतोलाच्या गोष्टी.मग असे असतांना आज असल्या परंपरा पाळणे गरजेचे आहे का? दारावर नाही लावले केळीचे खांब तर लक्ष्मी येणार नाही का? येईलच.दरवाज्यात नाही लावली पळसाची पाने तर राईरोग भागणार नाही का? भागेलच.अन् होळी नाही जाळली लाकडाची तर काही बिघडणार नाही अन् दस-याला नाही वाटले सोने तर काही बिघडणार नाही.
हं सण साजरे करा.करायला मनाई नाही.त्यासाठी झाडांची कत्तलच करायला हवी असे नाही.एकमेकांना अष्टगंध लावा.कुंकूम लावा.त्यानंही सण साजरा होवू शकतो दस-याचा.अन् द्यायचं असेल तर प्रेम द्या.तुमचं प्रेम त्या आपट्याच्या झाडाच्या पानापेक्षाही मोठं असू शकते.पोळ्याला मारबत हाकलण्यासाठी पळसाच्या डहाळ्याचा उपयोग करण्याऐवजी आपल्या वाणीचा उपयोग करा.घरात धूप लावा अत्तर लावा.गाईच्या शेणाच्या गोव-या जाळा.कापराच्या वड्या जागोजागी ठेवा.राळ जाळा.रोगराई दूर जावू शकते.तसेच होळीच्या वेळी जाळायचेच आहे तर अज्ञान जाळा.अन् जाळायचेच आहे तर विदेशी वस्तू जाळा.ज्या विदेशी वस्तू जाळून भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध असहकार उभारला होता.पण झाडांना जाळू नका.त्यांना तोडूही नका व असल्या परंपरा पाळू नका.ज्यात शेकडो वृक्षाची कत्तल होते.
हं प्रथा,परंपरा नक्की पाळा.त्या पाळायला मनाई नाही.पण त्या प्रथा,परंपरेत बदलाव करा.जेणेकरुन झाडांची कत्तल वाचेल व तुम्हीही पुण्याचे भागीदार बनाल.हे विसरु नका.

Related posts