दक्षिण सोलापूर

राजमाता जिजाऊ जयंती व आंतरराष्ट्रीय युवक दिन उत्साहात साजरा

विशेष प्रतिनिधी,
श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान वडाळा संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये दि. १२ जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात संपन्न झाली. ..

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. केतकी धाडवे यांनी उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. तसेच विद्यार्थ्यांना १२ जानेवारी या दिवसाचे महत्व पटवून सांगितले. विद्यार्थ्यांमधून कु. नेहा थोरात, वैष्णवी गव्हाने, ऋषिकेश फडके यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र स्पष्ट केले. महाविद्यालयातील प्रा. गणेश जाधव यांनी जयंतीनिमित्त विचाररूपी मंथन विद्यार्थ्यांसमोर मांडले.

अध्यक्षीय स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करून त्यांची प्रभावी अमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जिजाऊ मातेने ज्या प्रकारे शिवबा राजे घडविले, त्यांच्यावर जे संस्कार केले, स्वराज्याची संकल्पना मांडली, महिलांचा सन्मान करण्याची प्रेरणा दिली, ते विचार आजच्या काळात आचरणात आणण्याची गरज व त्याचे महत्व विषद केले. तसेच स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस आंतरराष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्या पाठीमागची भूमिका विस्तृतपणे मांडली. अगदी कमी कालावधीमध्ये भारतीय संस्कृती साता समुद्रापार पोहोचविण्याचे महान काम स्वामी विवेकानंद यांनी करून युवकांसमोर एक आदर्श उभा केला आहे. त्यांचे देशप्रेम व विचार आजच्या युवकांनी आत्मसात करून त्याचे अवलोकन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

स्व कर्तुत्वातून अनेक चांगल्या गोष्टी निर्माण होतात मात्र त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, मेहनत, त्याग, हालअपेष्टा सहन करण्याची ताकद आजच्या युवकांनी स्वत: मध्ये निर्माण केली तरच उद्याच्या बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण होईल व त्यासाठी देशातील प्रत्येक युवकाने महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. आभार प्रदर्शन तात्यासो शेजुळ या विद्यार्थ्याने केले. कार्यक्रमाचे आयोजन गुगल मिट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

Related posts