Blog

कॅप्टन “धोनी” मतलब, ठंडा ठंडा कुल कुल

साल २००७, स्थळ द.आफ्रिका आणि निमित्त होते पहिल्या वहिल्या टी ट्वेंटी विश्वचषकाचे. १९८३ च्या विश्वचषकाचे गोडवे ऐकून कान थकले होते. मात्र तब्बल २४ वर्षांनंतर देशाला  *नवा गडी नवा राज* प्रमाणे एक २६ वर्षीय ताज्या दमाचा कर्णधार लाभला होता जो इतिहास रचायला तयार होता. अर्थातच *सचिन, सौरव, द्रविड आणि लक्ष्मण सारख्या फॅंटॅस्टिक फोर* शिवाय धोनी अँड कंपनी काय दिवे लावतील याबाबत सर्वच साशंक होते परंतू दुसरीकडे युवा कर्णधार आपल्या यंग ब्रिगेडबाबत निश्चिंत होता.
अखेर आपल्या अनोख्या नेतृत्व कलेने धोनीने टी ट्वेंटी विश्र्वचषक जिंकत टी ट्वेंटी च्या इतिहासात आपले नाव अजरामर केले. शिवाय तो केवळ नशिबाच्या भरवश्यावर सामने जिंकत गेला असे नव्हे तर त्याचे जिंकण्याचे अगम्य डावपेच कित्येक क्रिकेट पंडीतांना बुचकळ्यात टाकणारे होते. त्याने *दे धक्का* तंत्राने आपली कारकिर्द गाजवली आणि याच नियमाने निवृत्ती सुद्धा पत्करली‌. असे असले तरी आयसीसीचे तिन्ही प्रकारचे विश्र्वचषक (२००७ टी ट्वेंटी, २०११ एकदिवसीय आणि २०१३ चॅम्पियन ट्रॉफी) जिंकण्याचा भिमपराक्रम केवळ धोनीच्याच नावे आहे.
 *मोठ्या वृक्षाच्या सावलीत लहान झाडांची वृद्धी होत नाही* असे म्हणतात. मात्र धोनीचे नेतृत्व याला अपवाद ठरले. आपल्या पंखाखाली त्याने सुरेश रैना, मुरली विजय, रोहीत शर्मा, रॉबिन उथप्पा, विराट कोहली, श्रीसंत, प्रविणकुमार,मुनाफ पटेल, रविचंद्रन अश्विन यांसारख्या खेळाडूंना मुक्तहस्ते वरदान देत त्यांची कारकीर्द बहरण्यास मदत केली. हिऱ्याची पारख करणाऱ्या जोहरी प्रमाणे धोनी एखाद्या खेळाडूत दडलेल्या सुप्त गुणांना हुडकून त्याला पैलू पाडायचा. यष्टीमागे असो वा यष्टीपुढे, कर्णधारपदी असो वा नसो मैदानावर माही शिवाय टीम इंडियाचे पान ही हालत नसे.
वास्तविकत: द.आफ्रिकेचा हॅंसी क्रोनिऐ आणि पाकचा इम्रानखान रुबाबदार कर्णधार म्हणून ओळखले जातात परंतु धोनीला *उत्तम क्रिकेटींग ब्रेन* लाभल्याने त्याची गणती एका सरस कर्णधारात होते. याची चुणूक त्याने २००७ च्या टी ट्वेंटी विश्वचषकात अंतिम सामन्यात पाकविरूद्ध अखेरचे षटक जोगिंदर शर्माच्या हाती चेंडू सोपवून दाखवून दिली होती. शिवाय पाकविरूद्धच्या साखळी सामन्यात बॉलआऊटचा पर्याय समोर येताच सेहवाग, उथप्पा आणि हरभजन कडून गोलंदाजी करून घेत पाकला सहज धुळ चारली होती. खरोखरच *बेस्ट फ्रॉम रेस्ट* च्या कलेत माही माहीर होता.
टी ट्वेंटी विश्र्वचषक जिंकताच धोनीचे नेतृत्वगुण आणखी बहरले आणि याचा नमूना त्याने २००८ ला कांगारूंना त्यांच्याच अंगणात ट्रायसिरीजमध्ये धोबीपछाड देत दाखवून दिला. मात्र याकरिता कटू निर्णय घ्यायला तो अजिबात कचरला नाही. संघातील *हेवीवेट खेळाडूंना हळूच खो देत त्याने यंगिस्तानची फळी उभारली*. त्याने गौतम गंभीर, रोहीत शर्मा आणि प्रविणकुमार सारख्या खेळाडूंवर बाजी लावली आणि खडूस रिकी पॉंटींगच्या नाकावर टिच्चून पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात तिहेरी मालिका जिंकून दाखवली.


धोनीचा खरा कस २०११ विश्र्वचषकात लागला. मुख्य म्हणजे यात त्याने गोलंदाजांचा कल्पक वापर करत सामने आपल्या नावे केले.  रविचंद्रन अश्र्विन आणि हरभजनच्या फिरकीच्या बेड्या तोडू न शकणारे फलंदाज कामचलाऊ गोलंदाज युवीवर तुटून पडायचे आणि इथेच त्यांची फसगत व्हायची‌. युवीचा फलंदाजी सोबत गोलंदाजीतही योग्य वापर करत माहीने त्याच्या अष्टपैलूत्वाला न्याय दिला‌. मुख्य म्हणजे अंतिम सामन्यात सचिन, सेहवाग, कोहली तंबूत परतल्यावर आणि सामना चुकुनही लंकेच्या बाजूला झुकू नये म्हणून तो युवीच्या पहिले पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यापुढचा इतिहास तर प्रत्येक भारतीय क्रिकेट रसिकांना नक्कीच मुखोद्गत असेल यात शंका नाही. याप्रसंगी *लिडिंग फ्रॉम दी फ्रंट काय असते* याचे उत्तम उदाहरण धोनीने प्रस्तूत केले होते.
१९९८ पासून आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात झाली होती आणि या स्पर्धेत टीम इंडियाला २०१३ पर्यंत निर्भेळ यश मिळाले नव्हते. नाही म्हणायला २००२ ला भारत आणि श्रीलंका यात संयुक्त विजेतेपद विभागले गेले होते. अखेर हे सुद्धा पुण्यकाम धोनीच्याच हाती लिहिले होते. इथेसुद्धा त्याने मध्यफळीत गुदमरलेल्या रोहीत शर्माला बाहेर खेचून थेट सलामीला धाडले आणि रोहीतचा सलामीवीर म्हणून राज्याभिषेक करुन टाकला. याच रोहीतने नंतर सलामीला येऊन विश्वविक्रमी खेळी केल्या. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला आणि *वर्षानुवर्षांचा लगाण वसूल करत* चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती.
आयसीसी चषके जिंकण्यासोबतच माहीचा जलवा आयपीएल मध्येही बघायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना त्याने आपल्या संघाला तिनदा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले तर तब्बल आठ वेळा तो आपल्या संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला होता. अर्थातच इतकी भरगच्च कामगिरी करणाऱ्या माहीला निरोप सुद्धा त्याचा लौकिकाला साजेसा मिळायला हवा होता. मात्र ना त्याने याबाबत कधी याची वाच्यता केली ना बीसीसीआयकडून काही संकेत मिळाले. उगवत्या सूर्याला प्रणाम करणाऱ्या या दुनियेत माहीचा सूर्य मावळतीला लागताच त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले. *महाभारतातील युद्धात शरपंजरी पडलेल्या भिष्म पितामहा सारखी माहीची अवस्था झाली होती*. 
अखेर घोर उपेक्षा आणि अनिश्चिततेला स्वत:हून तिलांजली देत माहीने *स्वातंत्र्यदिनी स्वतंत्र बाणा दाखवत* आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. निश्चितच एखाद्या खेळाडूच्या निवृत्तीने क्रिकेट संपणार नाही. मात्र धोनीने आपल्या कर्तृत्वाने क्रिकेटमध्ये जे अढळपद प्राप्त केले होते त्याला तोड नाही. यानंतही टीम इंडियाचे यष्टीरक्षक समर्थपणे यष्टीरक्षण करेल यात शंका नाही. मात्र फलंदाजांना क्रिझच्या उंबरठ्यावर मामा बनवणारे किपींग खरंच कोणाला जमेल काय?
 स्टंपला पाठमोरे होत फलंदाजांना यापुढे धावबाद कोण करणार? फक्त एका हातात ग्लोव्हज घालून, नॉन स्ट्राईकींगकडून धावत येणाऱ्या फलंदाजाला चित्याच्या चपळाईने धावत धावचीत कोण करणार? यष्टीमागून गोलंदाजांना उपयुक्त टीप कोण देणार? डीआरएस बाबत आता खात्रीलायक कोणाकडे विचारणा होणार अशा एक ना असंख्य प्रश्र्नांची उत्तरे आता टीम इंडियाला स्वत: शोधावी लागणार आहेत. कारण बिकटप्रसंगी मदतीला धावून येणारा माही आता टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार नाही. माही उरला आहे तो फक्त आता एक माजी खेळाडू म्हणून. कदाचित यापुढे बीसीसीआयची कृपादृष्टी राहिली तर तो प्रशिक्षकाच्या भुमिकेत अथवा समालोचन करताना आपल्याला दिसू शकतो. शेवटी माहीच्या महान कार्याला सलाम ठोकून आपण सध्यातरी इतकंच म्हणू शकतो.*ना तू जमीं के लिये हैं, ना है आसमां के लिये**तेरा वजूद है तो, सिर्फ दास्तां के लिये******************************************

डॉ अनिल पावशेकरमो. ९८२२९३९२८७

Related posts