अक्कलकोट

वटवृक्ष देवस्थानचे भक्तनिवास आजपासून भाविकांच्या सेवेत 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले येथील मैंदर्गी गाणगापुर रोड वरील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे भक्त निवास देव दीपावलीच्या शुभमुहूर्तावर देवस्थानच्या वतीने भाविकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात आले. याची सुरुवात मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी कोरोना लॉकडाऊनमुळे दिनांक १७ मार्च २०२० पासून प्रशासनाच्या आदेशानुसार येथील भक्त निवास बंद ठेवण्यात आले होते.

प्रशासनाच्या आदेशानुसारच देव दीपावलीच्या शुभमुहूर्तावर दिनांक १५/१२/२०२० रोजी स्वामी दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना राहण्याकरीता देणगी मुल्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे. भक्त निवास मधील सर्व २२८ खोल्या व सर्व हॉल स्वच्छ धुऊन घेण्यात आले असून परिसराचीही साफसफाई करण्यात आलेली आहे. भक्त निवास खोल्यांमध्ये व परिसरात सॅनिटायजरची फवारणी करून सर्व खोल्या निर्जंतुकीकरण करून घेण्यात आलेले आहेत. याची अंमलबजावणी नियमितपणे भविष्यातही करण्यात येईल.तसेच देवस्थान लगत असलेले देवस्थानच्या मुरलीधर मंदीर येथील निवास व्यवस्थाही स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून सुरूवात करण्यात आली आहे असे स्पष्ट करून स्वामी भक्तांनी स्वामींच्या दर्शनाकरिता व निवासा करिता निश्चिंतपणे येऊन लाभ घ्यावा असे आवाहन महेश इंगळे यांनी केले आहे.

Related posts