Blog

कोरोणा काळातील गृहिणीची लगबग—

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद।

===========================================================================================

आज आपण सर्वजण कोरोना महामारी च्या या संकटापासून त्रस्त झालेले आहोत, आपल्या चोहीकडे कोरोनाचे सावट आहे, याच सावटाखाली आपण आपले जीवन जगत आहोत! आपण सर्वजण आपापल्या घरी आपापल्या घर संसारात रमून जातो. आपण आपल्या कामात, नोकरीत, शेती, उद्योगधंद्यांमध्ये इतके गढून जातो की, आपले घर चालवणाऱ्या या गृहिणीला विसरून जातो, विस्मरण होते, घरच्या गृहलक्ष्मीचा, तिच्या सतत करत असलेल्या कामाचं, संपूर्ण घरावरील तिच्या प्रेमाचं, तिच्या कर्तृत्वाचं, ती पार पाडत असलेल्या जबाबदारीचं, आपल्याला कदाचित विस्मरण होतं .आपली गृहिणी आई असेल ,पत्नी असेल, बहीण असेल, वहिनी असेल, किंवा आणखी कोणतीही घरची स्त्री असेल ,ती आपल्या घरासाठी काहीही सहन करेल ,आपल्या माणसांसाठी कितीही त्रास सहन करेल, पण ती बोलून दाखवणार नाही की, घरच्या सदस्याला वाईट वाटेल असं कधीही वागणार नाही.

गृहिणी ही आपल्या घराचे वैभव असते, आपल्या घराचे मांगल्य असते,प्रसन्नता असते प्रमुख व्यवस्थापक असते आणि ती घरचे व्यवस्थापन अतिशय सुंदर व उत्कृष्टपणे करीत असते! याचे भान ही आपल्याला राहत नाही. घरी लागणाऱ्या सगळ्या वस्तू दूध, पाणी, भाजीपाला ,औषधे, किराणा सामान, यांचा सगळा हिशोब व लिस्ट तिच्याकडे असते. घरामध्ये काय कमी आहे व काय आणावयाचे आहे याचे संपूर्ण नियोजन गृहिणीकडे असते. शनिवार रविवार किंवा सुट्टीचा दिवस आला की त्या दिवसाचे सगळे नियोजन वेगळे असते मग सकाळच्या नाश्टयापासून दुपारचे जेवण व संध्याकाळचे जेवण याचे सगळे नियोजन तिच्याकडे तयार असते. करावे तेवढे कौतुक व अभिनंदन या गृहिणीचे कमीच पडते! खरंतर संसार हा दोघांचा असतो पती-पत्नीचा व त्यासोबतच सर्व कुटुंबीय पण, सर्व कुटुंबियांना एका सूत्रात एका प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवण्याची शक्ती ही गृहिणी कडे असते.

आपल्या कुटुंबाला एकत्र कुटुंब ठेवण्याची शक्ती या गृहिणीत असते लेकरांसाठी, संपूर्ण कुटुंबासाठी, दिवसभर राब राब राबते ती गृहिणी! लहाणापासून ते मोठ्या पर्यंत ची सर्वांची कामे करते ती गृहिणी! कधी आळस किंवा नकारात्मक भूमिका घेत नाही. मित्रांनो, गृहिणी ही प्रामाणिकपणे आपले कर्तव्य आपली जबाबदारी पूर्ण पार पाडत असते हे आपल्या लक्षात हि नसते आज कोरोना महामारी चा काळ चालू आहे सर्वत्र लॉकडाऊन चालू आहे, सर्वांना सुट्टी आहे, शाळा, महाविद्यालय, उद्योगधंदे, कंपन्या सगळ्यांना सुट्टी आहे पण आमच्या गृहिणीला कसलीही सुट्टी नाही! गृहिणीला कधीही सुट्टी नव्हती !!आणि आजही नाही उलट् लॉक डाऊन च्या काळात तिचे काम दुपटीने वाढलेले आहे .आपण सर्वजण घरीच बसून आहोत त्यामुळे दिवसभर काम, स्वयंपाक, जेवणे नाश्ता, चहापाणी असे दुप्पट काम वाढलेले आहे पण अशा परिस्थितीत सुद्धा बिचारी गृहिणी आपली जबाबदारी आनंदाने व उत्साहाने न डगमगता पार पाडत आहे हे आपल्या भारतीय गृहिणीचे खास वैशिष्ट आहे .

भारतीय संस्कृती जपण्याचे ,एकत्र कुटुंब पद्धती जपण्याचे कार्य आपल्या गृहिणीने केलेले आहे भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो विविध सण-वार उत्साहात आनंदात साजरा करणे यात गृहिणीचा सिंहाचा वाटा असतो. हे पुरुषप्रधान संस्कृतीला मानावेच लागेल !मोठ-मोठ्या सणासाठी चे नियोजन करणे, घरचे सर्व व्यवस्थापन करणे तेही आपल्या लेकरा बाळांना सांभाळत !त्यातच पाहुण्यांची घरी रेलचेल असते येणाऱ्या जाणाऱ्यांची मनधरणी करणे व सर्वांना खूष ठेवणे हे गृहिणीचे खास वैशिष्ट्ये सांगता येतील. कितीही रागात किंवा तणावात असेल तेव्हा ही ती आपल्याशी चांगलेच बोलते आपण विचाराल सगळं गृहिणीच बघते मग आपण काय काम करतो? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारला तर आपल्याला त्याचे उत्तर सहजपणे मिळून जाते मला ऑफिसला जायचे आहे, मला बाहेर जायचे आहे, मला मिटींगला जायचे आहे, मला प्रशिक्षणाला जायचे आहे, माझे ऑनलाईन क्लासेस आहेत, इत्यादी इत्यादी सांगून आपण मोकळे होतो. घरातील छोटे मोठे काम करण्यास ही आपण कधी सापडत नाही आता बोला! घरातील देव-देवतांची तर आपल्याला ओळख ही नसते पोथी, पुराणापासून तर आपण बारा हात लांबच असतो !

आज आपण विज्ञान-तंत्रज्ञानात कितीही प्रगती केली, तरी कुटुंबा चा प्रमुख आधार ही गृहिणीच आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल. गृहिणी ही आपल्या कुटुंबाचा मुख्य आधार असते, ती आपल्याला स्वादिष्ट व रुचकर भोजन बनवण्याचे व पोटभर खाऊ घालन्याचे अत्यंत मोलाचे कार्य करते. अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे व ते आपण आनंदाने सेवन करीत असतो.यामधे नोकरी करणाऱ्या काही गृहिणी आहेत त्यांची तर तारेवरचि कसरत सुरु असते! त्याना तर दोन्ही कड़चा भार उचलावा लागतो पण सर्व कुटुंबिय मिळून त्याना मद्त करीत असतात.आपल्या कुटुंबात फक्त गृहिणीच नव्हे तर घरातील सर्व लहान थोर मंडळी आपापल्या परीने जीव तोडून काम करीत असतात घरातील मोठी माणसे तर आपल्या घरांचा मोठा आधार असतात वेळ प्रसंगी आपल्याला योग्य मार्गदर्शन व शुभ आशीर्वाद देतात .दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार अगदी चिमण्या पाखरांच्या घरट्याला जसा फांदीचा मजबुत आधार असतो अगदी तसेच आपल्या जीवनाला या थोरामोठ्यांचा आधार असतो, बळ असते ,पाठबळ मिळते, एक प्रकारची शक्ती मिळते.

आपण लहानपणी निबंध लिहायचो आठवते का बघा !आई सुट्टीवर गेली तर —– मी आणि आपण सर्वजण काय कराल ?कसे दिवस काढाल? यावर सविस्तर लिहित होतो पण आज कल्पना जरी केली की आठ दिवस गृहिणी सुट्टीवर गेली तर काय अवस्था होईल आपली तुम्ही कितीही मोठे अधिकारी असाल ,कर्मचारी असाल, उद्योगपती असाल ,तरी आपल्याला घरातील काही एक कळत नाही .एकही वस्तू आपल्याला सापडणार नाही दुसरा पर्याय म्हणून आपण बाहेरील जेवण, मेसचे जेवण डबा मागउ परंतु आपल्या गृहिणीचे जेवणातील प्रेम, गोडी, व चव त्याला कधीच येणार नाही! म्हणून म्हणावेसे वाटते की गृहिणी ही फक्त गृहिणी नव्हे ती तर खरी कुटुंबाची गृहलक्ष्मी असते !बिचारी गृहिणी सतत आपल्या परिवाराचा चिकाटीने आपले पैसे वाचवण्याचा प्रयत्न करीत असते. कधी कधी आपल्या नकळत ती एक एक रुपया साठवते बचत करते व कालांतराने ती एवढी मोठी रक्कम होते की आपणही चकित होऊन जातो! नेमकी अडचणीच्या वेळी ती आनंदाने आपल्याला मदत करते व आपली अडचण दूर करते आपल्याला माहितीही नसते संपूर्ण घराबद्दल कुटुंबाबद्दल काळजी वाहणारी प्रेम व कळवळा असणारी ही आपली गृहिणी एकमेवाद्वितीयच!! अशा या गृहिणीला माऊलीला त्रिवार नमन।। धन्यवाद।

Related posts