महाराष्ट्र

अबब! तब्बल १००० कोटींना विकलं गेलं घर

मुंबई – कोरोना महामारीमुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच रिअल इस्टेट क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यानंतर आता अर्थव्यवस्था सुरळीत होत असताना हे क्षेत्रही पुन्हा एकदा उभारी घेत आहे. दरम्यान विक्रमी व्यवहाराची नोंद मुंबईतील श्रीमंताचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिलमध्ये झाली आहे. तब्बल १००० कोटींचा घरखरेदीचा व्यवहार मलबार हिलमध्ये झाला आहे. हे घर डी-मार्ट रिटेल चेन चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी विकत घेतले आहे.
हा व्यवहार ३१ मार्चला झाला असून मलबार हिलमध्ये १००० कोटींना राधाकृष्ण दमानी यांनी विकत घेतलेल्या या घरासाठी ३० कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. बाजारभावानुसार य़ा घराची किंमत ७२४ कोटी रुपये आहे. ५७५२.२२ चौरस फुटांच्या घराचा हा व्यवहार सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात चर्चेचा विषय आहे.
‘डी-मार्ट’चे राधाकृष्ण दमानी हे मालक आहेत. भारतातील अनेक मोठ्या तसेच लहान शहरांमध्ये ‘डी-मार्ट’ च्या शाखा आहेत. ‘डी-मार्ट’मध्ये रोजच्या वापरातल्या किराणा मालासारख्या अनेक गोष्टी मिळतात. भारतातील किराणा मालाच्या अनेक यशस्वी चेन्सपैकी डी-मार्ट ही एक चेन आहे.
राधाकृष्ण दमानी यांचा भारतातील श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. नेहमी पांढरा शर्ट आणि पांढरी पँट अशी स्टाईल असणाऱ्या राधाकृष्ण दमानी यांना मिस्टर व्हाईट अँड व्हाईट म्हणून ओळखले जाते. राधाकृष्ण दमानी हे प्रसारमाध्यमे तसेच सोशल मीडिया या सर्व गोष्टींपासून दूरच असतात. शेअर बाजारातही राधाकृष्ण दमानी गुंतवणूकदार आहेत. राधाकृष्ण दमानिया यांनी २०१७ मध्ये त्यांच्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी केल्यानंतर दोनच दिवसांत संपत्तीमध्ये ६१०० कोटींची वाढ झाली होती.

Related posts