महाराष्ट्र

येत्या १ जूनपर्यंत एम्फोटेरेसीनच्या ६० हजार इंजेक्शन उपलब्ध होणार

म्युकर मायकोसिसचे राज्यात २ हजार २४५ रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. म्युकर मायकोसिस संदर्भात आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून म्युकर मायकोसिसवर मोफत उपचार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्लोबल टेंडरमध्ये राज्यांना प्रतिसाद नसल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.
राजेश टोपेंनी आढावा बैठकीनंतर बोलताना सांगितले की, म्युकर मायकोसिसच्या प्रत्येक रुग्णाची नोंद होणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि शल्यचिकित्सकांना सूचना दिल्या आहेत. म्युकर मायकोसिस आजारावर जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार होणार होतील. यासाठी जीआर निर्गमित कऱण्यात आला असून बजेटमधून ३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
म्युकर मायकोसिस आजाराच्या उपचारामध्ये वापरण्यात येणारे एम्फोटेरेसीन-बी इंजेक्शन प्रमाणात वाटपाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्यात या आजाराच्या उपचारासाठी १३१ रुग्णालये नोटिफाय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही रुग्णालये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे.
खासगी रुग्णालयामध्ये कोविडच्या अनुषंगाने जे रेट निश्चित करण्यात आले आहेत तसेच घ्यावेत असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. एम्फोटेरेसीन-बी इंजेक्शनसाठी ग्लोबल टेंडर काढल्याची माहितीही त्यांनी दिली. येत्या १ जूनपर्यंत ६० हजार व्हायल्स उपलब्ध होतील असे त्यांनी सांगितले.
राज्यात ३ लाख २७ हजार ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण
राज्यात आज घडीला ३ लाख २७ हजार ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील कोरोनामुक्तीचा रेट ९३ टक्क्यांवर गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट सध्या १२ टक्के आहे, तर मृत्यूदर १.५ टक्के आहे. ज्या जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हीटी रेट राज्याच्या तुलनेत जास्त आहे त्या ठिकाणी होम आयसोलेशनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले.
तसेच कोविड सेंटर सुरु करण्यास सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. कोविड सेंटरसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून ३० टक्के निधी कोविडसाठी खर्च करण्यास अनुमती दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

Related posts