शेतशिवार

💧ठिबक सिंचनमधून विद्राव्य खते वापरताना घ्यावयाची काळजी💧

👉🏻 विद्राव्य खते ही ठिबक सिंचनाद्वारे देत असल्यास, ठिबक सिंचन संचाकडे काळजीपूर्वक लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे. ठिबक संचाची मांडणी हि आराखड्यानुसार करावी.

👉🏻 विद्राव्य खते ही शेतामध्ये सर्व ठिकाणी समप्रमाणात दिली जावीत. म्हणून त्यासाठी खते पाण्यामधे एकसारखी मिसळायला हवीत. पाण्यामधे शक्यतो साका तयार होणार नाही याची काळजी घ्यावी.

👉🏻 योग्य मिश्रणासाठी पाण्यामध्ये टाकावीत, उलटे खतामध्ये पाणी टाकू नये.

👉🏻 पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन पाणी व खते समप्रमाणात द्यावीत.

👉🏻 ठिबक सिंचन संचातील फिल्टर्स वाळूचा फिल्टर, जाळीचा फिल्टर, मेन लाईन, सबमेन, लॅटरल, फिटिंग्ज, बॉल व्हॉल्व्ह व फ्लश व्हॉल्व्ह इत्यादी ठिकाणाहून होणारी गळती (लिकेज) पूर्णपणे बंद करावी.

👉🏻 शेतातील सर्व ड्रीपर्स समप्रमाणात पाणी देतात किंवा नाही हे तपासून बघावे. जर चकत्या नसतील तर योग्य चकत्या टाकून ड्रीपर्स पुन्हा फिट करून घ्यावेत.

👉🏻 ड्रीपर्सचे झाडापासून अंतर योग्य आहे किंवा नाही ते वारंवार निरीक्षण करत रहावे. खते आणि पाणी पिकाच्या मुळाच्या क्षेत्रातच द्यावे. ठीबकच्या नळ्या व्यवस्थितपणे जमिनीवर सरळ टाकाव्यात.

👉🏻 सॅन्ड फिल्टर, सबमेन नियमितपणे साफ {फ्लश} करणे गरजेचे असते. लॅटरल नळ्यांची तोंडे उघडून दर ८ ते १५ दिवसांनी पाण्याने दाब देऊन साफ करून घ्याव्यात.

👉🏻 पाण्याचा स्त्रोत उदा. विहीर, कालवा, धरण, नदी, तलाव असेल तर त्यात शेवाळे, गाळ, कचरा असेल तर अशा ठिकाणी ठिबक सिंचन संच दीर्घकाळ सुरळीत कार्यान्वित राहण्याकरिता स्क्रिन फिल्टरसोबत सॅन्ड फिल्टरची आवश्यकता असते.

👉🏻 खते विरघळविण्यासाठी पाणी स्वच्छ वापरावे.

👉🏻 खते देण्याअगोदर झाडांना पाण्याची किती गरज आहे हे त्या भागातील जमीन, हवामान, झाडाची अवस्था इत्यादी बाबींचा अभ्यास करून निश्चित करावी. साधारणत: जमीन ही रोज वाफसा अवस्थेत राहील एवढेच पाणी झाडांना दिले पाहिजे. कारण वाफसा स्थितीतच वनस्पती, हवा, पाणी अन्नद्रव्ये चांगल्या रीतीने घेऊ शकते.

👉🏻 एकदा ही पाण्याची मात्रा निश्चित केल्यावर विद्राव्य खते देण्याचा कालावधी निश्चित करावा. विद्राव्य खतांचा वापर एकूण सिंचनाच्या कालावधीच्या मधल्या कालावधीत करावयाचा असतो. समजा आपण १२० मिनिटे ठिबक सिंचन संच चालवित असल्यास ८० मिनिटे ठिबक सिंचन संचाद्वारे फक्त पाणी द्यावे. नंतर ३० मिनिटे विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे द्यावीत नंतर १० मिनिटे पुन्हा पाणी द्यावे. शेवटी पाणी एवढ्याकरिता द्यावे, कि जणेकरून ठिबक सिंचन संचात खते साचून न राहता खतांची सर्व मात्रा झाडांच्या मुळापर्यंत पोहचेल.

👉🏻 ठिबक मधून खते द्यायची संपल्यानंतर १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाणी देऊ नये.

👉🏻 पाण्याबरोबर खतांचा निचरा होतो म्हणूनच पिकांना गरजेइतकेच पाणी देणे महत्वाचे असते.

👉🏻 १ किलो विद्राव्य ड्रीप खते जसे १९:१९:१९, १२:६१:००, ००:५२:३४ इत्यादी विरघळविण्यासाठी कमीत कमी १५ लिटर पाणी वापरावे.

👉🏻 १ किलो ००:००:५० ड्रीप खत विरघळविण्यासाठी कमीत कमी २० लिटर पाणी वापरावे.

👉🏻 कॅल्शियम नायट्रेट व कॅल्शियम + बोरॉन मिश्र खत ही ड्रीप खते १३:००:४५ व्यतिरिक्त कोणत्याही खताबरोबर मिसळु नये.

👉🏻 सर्व नत्रयुक्त खते वातावरणातील आर्द्रता शोषून घेतात त्यामुळे ही खते उघडे ठेवल्यास ओलावा धरतात.

👉🏻 ह्यूमिक ऍसिड व सी विड पावडर पाण्यामध्ये मिसळताना ड्रम मधील पाणी अगोदर चक्राकार ढवळून घ्यावे व त्यानंतर पावडर हळूहळू पाण्यात टाकावी.

👉🏻 ह्यूमिक ॲसिड विरघळविण्यासाठी पाण्याचे प्रमाण १०० लिटर प्रति किलो एवढे वापरावे.

👉🏻 चिलेटेड मायक्रोन्युट्रीएंट वापरानंतर पॅकेट सील बंद करून ठेवावे.

👉🏻 कोणत्याही खताबरोबर कॅल्शियम, सल्फर व कॉपरयुक्त खते मिसळु नये. किंवा तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा..

👉🏻 फॉस्फरिक अॅसीड बरोबर कोणतेही फवारणी अथवा ड्रिप खत मिसळू नये.

👉🏻 काही अपवाद वगळता सर्व किटकनाशक व बुरशीनाशकाबरोबर फवारणी खते मिसळून फवारता येतात. परंतु मिसळण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. शक्यतो बायोस्टीमुलंट्स फवारताना ते कश्यातही मिसळू नयेत.

👉🏻 विद्राव्य खतांच्या उत्कृष्ट परिणामांसाठी कंपनीच्या शिफारशीप्रमाणेच उत्पादनाचा वापर करावा.

👉🏻 प्रत्येक पिकांच्या प्रस्तावित शिफारशीप्रमाणे (शेड्युलप्रमाणे)
खतांचा वापर केल्यास अनावश्यक खर्च टाळून खतांचे परिणाम मिळतिल.

👉🏻 चांगल्या परिणामासाठी व दर्जेदार उत्पादनासाठी नेहमी उच्च दर्जाची खते व औषधांचाच वापर करा.

Related posts